मुंबई : व्यवस्थापन क्षेत्रातील पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना एमबीए या पदवी व्यवस्थापन अभ्यासक्रमाला थेट प्रवेश दिला जातो. एमबीए द्वितीय अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश देण्यासाठी सीईटी कक्षाकडून राबवण्यात आलेल्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान अनेक विद्यार्थ्यांनी चुकीची टक्केवारी अर्जामध्ये नोंदवल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी सीईटी कक्षाकडून या विद्यार्थ्यांना अचुक टक्के भरण्यासाठी २७ ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे. अचूक टक्के न भरणाऱ्य विद्यार्थांचे नाव अंतिम गुणवत्ता यादीत समावेश करण्यात येणार नसल्याचे सीईटी कक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करीता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत एमबीए लॅटरल एन्ट्री (थेट द्वितीय वर्षासाठी) या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांकडून २५ जुलै ते ७ ऑगस्टदरम्यान ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरुन घेण्यात आले होते. त्यानुसार १८ ऑगस्ट रोजी अंतरिम गुणवत्ता यादी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. दरम्यान या यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांच्या पदवी अभ्यासक्रमांचा निकाल सीजीपीए पद्धतीने (ग्रेड पद्धत) जाहीर करण्यात आला आहे. अशा विद्यार्थ्यांनी अर्जामध्ये चुकीची टक्केवारी नमूद केल्याचे आढळून आले आहे.

हेही वाचा: Mumbai Metro : मुंबई मेट्रोचं काम सुरू असताना रस्त्याचा भाग खचला, कंत्राटदाराकडून रहिवाशांची थेट फाईव्ह स्टॉर हॉटेलमध्ये सोय!

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता सीईटी कक्षाने ज्या विद्यार्थ्यांचा निकाल सीजीपीए पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेच्या माहिती पुस्तिकामधील नियम ८ (३) (सी) अन्वये संबंधित सक्षम प्राधिकारी, विद्यापीठ किंवा मंडळाकडून सीजीपीएचे समतुल्य गुणांमध्ये रूपांतर झाल्याचे प्रमाणपत्र संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठी तसेच प्रमाणपत्रावरील अचुक टक्के भरण्यासाठी २७ ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे.

सीजीपीएचे रुपांतरीत करण्यात आलेले टक्के भरण्यासाठी विद्यार्थ्यांच्या लॉगीनमध्ये लिंक (CGPA to Marks Conversion Certificate authorised by concerned competent authority / Board / University) उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मात्र जे विद्यार्थी मुदतीमध्ये अचूक टक्के भरणार नाहीत अशा विद्यार्थ्यांचा नावाचे अंतिम गुणवत्ता यादीत समावेश केला जाणार नसल्याचे सीईटी कक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.