मुंबई : यलोगेट पोलीस ठाण्याच्या ऑरेंज प्रवेशद्वारावर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानाच्या रायफलचे मॅगझीन गायब झाल्याची घटना शनिवारी घडली होती. त्याप्रकरणी तीन संशयीतांना ताब्यात घेण्यात आले असून २४ तासांत मॅगझीन हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी यलोगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेहमीप्रमाणे शनिवारी यलोगेट येथे सीआयएसएफ जवान कर्तव्यावर होता. त्यावेळी अचानक एक मोटार प्रवेशद्वारातून आत आली. कर्तव्यावरील सीआयएसएफ जवानाने गाडी थांबवली आणि तो चालकाकडे चौकशी करू लागला. मात्र त्याचवेळी अचानक वाहन वेगाने सीएसएमटीच्या दिशेने निघून गेले. त्यावेळी जवानाची रायफल गाडीच्या दरवाजावर आपटली. गाडी निघून गेल्यानंतर गोळ्यांनी भरलेली मॅगझीन रायफलमध्ये नसल्याचे जवानाच्या लक्षात आले. सीएसएमटीच्या दिशेने वेगात गेलेल्या गाडीत मॅगझीन पडल्याचा संशय आल्यानंतर वाहनाचा क्रमांक मिळवून सर्व प्रवेशद्वारावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरण तपासण्यात आले.

हेही वाचा : चेंबूर-संताक्रूज उड्डाणपुलावर तीन वाहनांचा भीषण अपघात; तिघे जखमी

मुख्य नियंत्रण कक्ष व इतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून संबंधित गाडीचा शोध घेतला असता तीन संशयीत गौरव वगळ, श्रेयस चुरी व अजित माणगावकर यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता २० जिवंत काडतुसे असलेली मॅगझीन जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटरगाडीही पोलिसांनी जप्त केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai police found missing rifle magazine of cisf jawan three suspects detained mumbai print news css