मुंबईतल्या प्रभादेवीमधल्या एका टॉवरमधल्या 33 व्या मजल्याला आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. ब्यूमाँड असे इमारतीचं नाव असून बडे उद्योगपती, कलाकार व अनेक सेलिब्रिटी या इमारतीत राहतात. इमारतीच्या उंचीमुळे या मजल्यावरील आग विझवण्यास अडथळे येत असल्याचं उपस्थितांनी सांगितलं. याच इमारतीमध्ये 26व्या मजल्यावर दीपिका पादुकोणचाही फ्लॅट असल्याचं सांगण्यात आलं आहे. आगीवर आता काबू मिळवण्यात आल्याचं वृत्त आहे. मात्र, अजूनही प्रचंड प्रमाणात धूराचं साम्राज्य या परीसरात पसरलं असून अग्निशमन दलाचे जवान त्यावर संपूर्ण नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या आगीमध्ये 33 वा मजला भक्ष्यस्थानी पडल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच 32 व्या मजल्याचीही काही प्रमाणात हानी झाल्याचं वृत्त आहे. प्रभादेवीतली ब्यूमाँड ही इमारत 10 ते 12 वर्ष जुनी आहे. इमारतीचे बाकीचे मजले रिकामे करण्यात आले असून किती व कसली हानी झाली या संदर्भात निश्चित माहिती समजलेली नाही. मुख्यत: फर्निचर व अन्य सामान जळाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. मुंबईतल्या उच्चभ्रू वस्तीतला एक असा हा भाग मानण्यात येत असून उद्योगपती, कलाकार, राजकीय क्षेत्रातल्या व्यक्ती आदी सेलिब्रिटी या भागात राहतात. या इमारतीतही अनेक महत्त्वाच्या व्यक्ती राहत असल्याचं स्थानिकांनी सांगितलं.

[jwplayer qvQCWGir]

स्थानिक नगरसेवक समाधान सरवणकर यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी तातडीनं पावलं उचलण्यात आल्याचं सांगितलं आहे. इमारतीच्या उंचीमुळे तिथपर्यंत पोचण्यास थोडा त्रास होत असला तरी शक्य ते सगळे प्रयत्न करण्यात येत असल्याचं ते म्हणाले. आग विझवण्यासाठी आगीचे आठ बंब शर्थीचे प्रयत्न करत आहेत. जवळपास 90 जणांना इमारतीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. वेळीच इमारतीमध्ये असलेल्यांना बाहेर काढल्यामुळे जीवितहानी झालेली नाही. परंतु, 33व्या मजल्यापर्यंत आगीच्या बंबांचा पाण्याचा मारा कसा पोचेल ही एक समस्या जाणवत होती. याच कारणामुळे आग विझवण्यास काही प्रमाणात विलंब झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai prabhadevi building 33 floor catches fire