प्रवाशांना काळ्या-पिवळ्या टॅक्सीची उपलब्धता समजवी यासाठी यंदापासून रुफलाईट इंडिकेटर बसविण्याच्या नियमाची अंमलबजावणी करण्यात येणार होती. टॅक्सीवर इंडिकेटर बसवण्यासाठी चालकांना ३० जून २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु याकडे टॅक्सीचालकांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे ही सेवा अद्यापही प्रवाशांना उपलब्ध होऊ शकलेली नाही. या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ देण्याबाबत लवकरच मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाची बैठक आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

… म्हणून परिवहन आयुक्त कार्यालयाने घेतला होता निर्णय –

टॅक्सी मिळविण्यासाठी प्रवाशांना धावपळ करावी लागते. सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी टॅक्सी मिळत नाही. अनेक वेळा प्रवासी आणि टॅक्सीचालकांमध्ये खटके उडतात. टॅक्सीत प्रवासी नसतानाही ती थांबविण्यात येत नाही. तसेच या वाहनांमध्ये प्रवासी आहे की नाही अनेक वेळा समजत नाही. त्यामुळे प्रवाशांना टॅक्सी सहज उपलब्ध व्हावी यासाठी रुफलाईट इंडिकेटर बंधनकारक करण्याचा निर्णय परिवहन आयुक्त कार्यालयाने घेतला होता. टॅक्सीच्या वरच्या बाजूला तीन रंगात प्रकाशित करणारे एकच इंडिकेटर बसविण्याचे निर्देश देण्यात आले होते.

बैठकीची तारीख अद्याप निश्चित नाही –

नव्याने येणाऱ्या टॅक्सींसाठी १ फेब्रुवारी २०२० पासून रुफलाईट इंडिकेटर बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु त्याची अंमलबजावणी कशी करायची याबाबत परिवहन विभाग नियोजन करीत होते. त्यातच मार्च २०२० पासून करोनाचा संसर्ग सुरू झाला आणि नियोजन रखडले. त्यानंतर १ जानेवारी २०२१ पासून रुफलाईट बसवणे पुन्हा सक्तीचे करण्यात आले. त्यानंतर पुन्हा डिसेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढही देण्यात आली. मात्र करोना संसर्गावर नियंत्रण न मिळाल्याने, काही चालक गावाहून न परतल्याने, इंडिकेटर बसवण्यासाठी दोन हजार रुपयांपर्यंत येणारा खर्च, काही महिन्यापूर्वी नवीन भाडेदरामुळे मीटरमधील बदलासाठी येणारा खर्च इत्यादी कारणांमुळे इंडिकेटर बसवण्यासाठी चालक उदासिन असल्याचे दिसून आले. त्यामुळे मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने ३० जून २०२२ पर्यंत टॅक्सींवर रुफलाईट इंडिकेटर बसवण्यासाठी मुदतवाढ दिली होती. ही मुदतही गुरुवारी संपुष्टात आली असून प्राधिकरणाकडून पुन्हा मुदतवाढ देण्यात येण्याची शक्यता आहे. मात्र त्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या प्राधिकरणाच्या बैठकीची तारीख अद्याप निश्चित करण्यात आली नाही.

रुफलाईट इंडिकेटर मराठी व इंग्रजीत –

रुफलाईट इंडिकेटरवर पांढरा, हिरवा, लाल असे तीन रंग प्रकाशित होतील. मात्र त्या सेवा उपलब्ध आहेत की नाही, हे नमूद करणारे शब्द हे मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये असतील. त्यामुळे प्रवाशांना ते वाचणे सोपो होईल.

हिरवा रंग – फॉर हायर आणि टॅक्सी उपलब्ध

पांढरा रंग – ऑफ ड्युटी आणि टॅक्सी बंद

लाल रंग – हायर आणि टॅक्सी उपलब्ध नाही (म्हणजेच प्रवासी आहेत)

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai taxi drivers ignore roof light indicator mumbai print news msr
First published on: 30-06-2022 at 11:38 IST