कल्याणमध्ये एका पोलीस कॉन्स्टेबलने पोलीस उपनिरीक्षकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी कॉन्स्टेबलने पोलीस उपनिरीक्षकाच्या घरात शिरून काठीने बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत पोलीस उपनिरीक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बसवराज गर्ग असं हत्या झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे. तर पंकज यादव असं आरोपी पोलीस कॉन्स्टेबलचं नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डीसीपी सचिन गुंजाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पंकज यादव आणि मयत पोलीस उपनिरीक्षक बसवराज गर्ग हे दोघं २०१९ मध्ये एकत्र नोकरीला होते. दरम्यान, आरोपी पंकज यादव आणि त्याच्या एका साथीदाराचं भांडण झालं होतं. याचा तपास बसवराज गर्ग यांच्याकडे होता. याप्रकरणी पंकज यादव यांची चार वर्षांसाठी पगारवाढ थांबवण्यात आली होती. शिवाय त्याची बेसिक सॅलरीही कमी करण्याची शिक्षा देण्यात आली होती.

तेव्हापासून आरोपी पंकज यादवच्या मनात राग खदखदत होता. मयत पोलीस उपनिरीक्षक बसवराज गर्ग यांच्यासह पोलीस निरीक्षक बर्वे आणि पोलीस निरीक्षक माने हेही आपल्या शिक्षेसाठी कारणीभूत आहेत, असा समज आरोपी पंकज यादवचा होता. त्यामुळे घटनेच्या दिवशी आरोपीनं बसवराज गर्ग यांची हत्या केल्यानंतर तो पोलीस निरीक्षक बर्वे यांना मारण्यासाठी चिपळूनच्या दिशेनं जात होता, अशी माहिती डीसीपी गुंजाळ यांनी दिली.

कल्याण कोळसेवाडी पोलिसांना हत्येची माहिती मिळताच, पोलिसांची दोन पथकं आरोपीला पकडण्यासाठी रवाना झाली. पोलिसांनी आरोपीला पेन येथून बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी पोलीसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून घटनेचा अधिक तपास केला जात आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police constable killed police sub inspector in kalyan beat with stick rno news rmm