मुंबईत विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या, सिग्नल तोडून दुचाकी पळवणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संबंधित पोलीस उपनिरीक्षकाला एका प्रवाशाने जाब विचारल्यावर त्याला उद्धट उत्तर दिल्याचे व्हिडिओत कैद झाले असून या प्रकरणाची दखल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही घेतली आहे. संबंधित व्हिडिओतील पोलीस उपनिरीक्षकावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असून त्या पोलीस उपनिरीक्षकाकडून ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर Rev It Up (@BhatkarHardik) या अकाऊंटवरुन एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. या व्हिडिओत एक पोलीस उपनिरीक्षक सर्रास वाहतुकीचे नियम मोडून दुचाकी चालवताना दिसत होता. हा सर्व प्रकार एका दुचाकीस्वाराने मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. काही वेळाने दुचाकीस्वार तरुणाने संबंधित पोलीस उपनिरीक्षकाला तुमचे हेल्मेट कुठे आहे, तुम्ही सिग्नलही मोडले, असे विचारले. त्यावर उत्तर पोलीस उपनिरीक्षकाने उद्धटपणे उत्तरे दिली.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनीही व्हिडिओची दखल घेतली. संबंधित पोलीस उपनिरीक्षक सशस्त्र विभागात नेमणुकीस आहेत. हेल्मेट न वापरल्याबद्दल, सिग्नल मोडल्याबद्दल ई चलन पाठवून कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एकूण ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच गैरवर्तनाबद्दल योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबई पोलिसांनी दाखवलेली सतर्कता चांगली बाब आहे. संबंधित पोलीस उपनिरीक्षकावर कारवाई करण्यात आली आहे. एका पोलीस अधिकाऱ्यामुळे संपूर्ण पोलीस दलावर टीका करु नये, असे आवाहनही हा व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या तरुणाने केले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Psi on two wheeler violated traffic rules in mumbai video viral