करोना रोखण्यात मुंबई महापालिकेने “धारावी मॉडेल” यशस्वी केले आहे. या यशस्वी प्रयत्नांतील अनुभव, साद्यंत माहितीचा आढावा घेणाऱ्या “दी धारावी मॉडेल” या पुस्तकाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज (मंगळवार) प्रकाशन करण्यात आले. यावेळी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. या पुस्तकाचे लेखक किरण दिघावकर हे मुंबई महापालिकेचे सहायक आयुक्त आहेत. वर्षा निवासस्थानी झालेल्या या प्रकाशनाप्रसंगी लेखक दिघावकर यांच्यासह मुंबई महापालिकेचे आय़ुक्त आय. एस. चहल, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लेखक दिघावकर यांनी या पुस्तकात धारावीमध्ये कोविड-19 विषाणू संसर्ग रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने केलेल्या उपाययोजना, प्रयत्नांची मांडणी केली आहे. या उपाययोजनांना जागतिक पातळीवर गौरवले गेले आहे. केंद्र सरकार, जागतिक बँक, जागतिक आरोग्य संघटनेकडूनआणि विदेशातही धारावी मॉडेलचे कौतुक केले गेले आहे. धारावी मॉडेल म्हणून ही कार्यपद्धती अन्य देशांमधील अशा दाट लोकवस्तीच्या झोपडपट्टीमध्येही अवलंबण्यात येत आहे. कोविडच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही धारावी मॉडेलने आपले नाणे खणखणीत असल्याचे सिद्ध केले आहे.

धारावीतील कोविड व्यवस्थापन करताना दिघावकर यांना आलेले अनुभव आणि आठवणी यांचे हे पुस्तक स्वरुपातील संकलन आहे. इंग्रजीतील हे पुस्तक लवकरच मराठी आणि इतर भाषांमध्ये अनुवादीत स्वरुपात उपलब्ध होणार आहे. पुस्तक ई- बुक स्वरुपात देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यातील वाचकांना धारावी मॉडेल विस्तृत स्वरूपात जाणून घेणे शक्य होणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Publication of the book the dharavi model by chief minister uddhav thackeray msr