गणेशोत्सवाच्या काळात आरोग्य शिबीर घेण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या संकल्पाला मुंबईमध्ये सुरुवात झाली आहे. सोमवारपासून लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या आरोग्योत्सवाची सुरुवात झाली आहे. या आरोग्योत्सव आणि प्लाझ्मादान शिबिराचे उद्धघाटन खासदार शरद पवार यांच्या हस्ते पार पडले. लालबाग मार्केट येथे झालेल्या एका कार्यक्रमामध्ये या शिबीराची सुरुवात करण्यात आली. या शिबीराचे आयोजन केल्याबद्दल शरद पवार यांनी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कौतुक केलं आहे. या उद्घाटनाच्या कार्यक्रमातील काही फोटो पवारांनी ट्विटरवरुन शेअर केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“कोरोना संकटाशी मुकाबला करण्यासाठी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा श्रींची प्रतिष्ठापना न करता लोकमान्य टिळकांच्या स्मृतिशताब्दी महोत्सवाचे औचित्य साधत आरोग्योत्सव व प्लाझ्मादान शिबिराचे आयोजन केले. या अतिशय स्तुत्य उपक्रमाचे उद्घाटन करताना मला मनपूर्वक आनंद वाटला,” असं पवार म्हणाले आहेत.

करोनाविरोधी लढाईत जनतेची सेवा करताना प्राण गमावलेल्या ९२ पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना १ लाख रुपये व शौर्यचिन्हाने सन्मानित करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. यापैकी दोन कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना पवारांच्या हस्ते धनादेश देण्यात आले.  “९२ शहीद पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक लाखांचा धनादेश देण्याचे काम मंडळाने हाती घेतले आहे. याची सुरुवात आज झाली. शहीद जवान सचिन मोरे व सुनील काळे यांच्या कुटुंबियांना आज दोन लाख रुपयांचा धनादेश सन्मानपूर्वक सुपूर्द करण्यात आला,” अशा माहितीसहीत पवारांनी काही फोटो ट्विट केले आहेत.

“लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सवाने या उपक्रमांद्वारे अतिशय चांगला आदर्श सर्वांपुढे ठेवला आहे. मंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे त्याबद्दल मी अभिनंदन करतो,” असंही पवारांनी ट्विटवरुन म्हटलं आहे.

केईएम रुग्णालयाच्या सहकार्याने लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आयोजित केलेलं हे शिबीर होणार असून ३ ते ३१ ऑगस्ट दरम्यान सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळात प्लाझ्मादानाकरिता  नोंदणी करता येणार आहे. २२ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या काळात विविध आस्थापनांतील कोविडयोद्धय़ांचा सन्मान केला जाणार असून सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत रक्तदान शिबीर घेतले जाणार आहे.

चिंतामणी मंडळाच्या रक्तदान शिबिरामध्ये १८८ जणांचे रक्तदान

करोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी मुंबईतील काही मंडळांनी यंदा गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना न करता सामाजिक काम, आरोग्य शिबिरे घेण्याचा संकल्प केला. १०१ वर्षांची परंपरा असलेल्या चिंचपोकळीच्या चिंतामणी मंडळाने यंदा उंच मूर्ती न आणता जनआरोग्य वर्ष साजरे करण्याचे ठरविले आहे. शनिवारी या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. या वेळी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार आशीष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरासाठी एकूण १८८ रक्तदात्यांचे रक्त वाडिया रुग्णालय रक्तपेढीच्या सहकार्याने संकलित क रण्यात आले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar praises lalbaugcha raja ganesh mandal for initiatives scsg