दोन जणांचा मृत्यू, रुग्णांची संख्या गेल्या १५ दिवसांत दुपटीहून अधिक

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : गेल्या पंधरा दिवसांत मुंबईत स्वाइन फ्लूचा जोर चांगलाच वाढला असून त्यामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. जुलैच्या पहिल्या पंधरा दिवसांच्या तुलनेत महिन्याच्या शेवटी रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे.

या वर्षी पावसाची सुरुवात जूनच्या शेवटच्या आठवडय़ापासून झाली. जुलै महिन्यात पावसाचा जोर चांगलाच वाढत गेला. जून महिन्यात एकही स्वाइन फ्लूचा रुग्ण शहरात आढळला नव्हता.

पाऊस आणि उकाडा या बदलत्या वातावरणामुळे जुलैच्या पहिल्याच आठवडय़ात स्वाइन फ्लूची लागण सुरू झाली. जुलैच्या पहिल्या पंधरा दिवसांमध्ये ३६ रुग्णांना बाधा झालेली आढळली. जुलैच्या शेवटच्या १५ दिवसांत ७७ रुग्णांना स्वाइन फ्लूची बाधा झाली आहे. जुलैमध्ये डोंबिवली आणि मुंब्रा येथील दोघांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे.

काय काळजी घ्याल?

फ्लू किंवा लेप्टोची लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरू करावेत. पालेभाज्या स्वच्छ धुवून वापराव्यात. साचलेल्या पाण्यात चालू नका. घराजवळच्या परिसरात पाणी साचणार नाही, याची काळजी घ्या. पाळीव प्राण्यांना लेप्टोची लस द्यावी, असे आवाहन पालिकेने नागरिकांना केले आहे.

डेंग्यू आणि लेप्टोनेही मृत्यू

शहरात डेंग्यूचा संसर्गही वाढत असून जुलैमध्ये ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. जुलैमध्ये २१ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे आढळले. शहरात ठिकठिकाणी तुंबलेल्या पाण्यामुळे ५५ वर्षीय महिलेचा लेप्टोस्पायरोसिसने मृत्यू झाला आहे. लेप्टोच्या रुग्णांची संख्याही वाढली असून जुलै महिन्यात ६२ रुग्णांना संसर्ग झाल्याचे आढळले. याव्यतिरिक्त जुलै महिन्यात मलेरिया (३५१), गॅस्ट्रोचे (८९४) रुग्ण आढळले आहेत.

रुग्णांची संख्या

                      जून    जुलै 

स्वाइन फ्लू     ०      ११३

लेप्टो               ५      ६२

डेंग्यू                ८      २१

मलेरिया          ३१०    ३५१

गॅस्ट्रो              ७७७    ८९४

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swine flu cases raises in mumbai zws