महेश बोकडे
भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांच्या सेवाशक्ती संघर्ष, एसटी कामगार संघ आपल्या १६ मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी २८ फेब्रुवारीपासून मुंबईच्या आझाद मैदानात आत्मक्लेश आंदोलन करणार आहे. पडळकरांच्या नेतृत्वातील संघटनेच्या या आंदोलनामुळे शिंदे- फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >>>“अमित शाह उपग्रहाद्वारे ईव्हीएम नियंत्रित करतात,” चंद्रकांत खैरेंचा खळबळजनक आरोप; म्हणाले, “त्यांनी यासाठी..”
दरम्यान, महामंडळानेही या संपाच्या नोटीसला गांभीर्याने घेतले आहे. महामंडळाकडून सगळ्या विभाग नियंत्रक व कार्यशाळा व्यवस्थापकांसह इतर विभाग प्रमुखांना पाठवलेल्या पत्रानुसार, या आंदोलनात सहभाग घेणे गैरवर्तणुकीची बाब समजली जाईल व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना त्या दिवशी कामावर हजर राहण्यास स्वत: अधिकाऱ्यांना सांगायचे आहे. आंदोलनादरम्यान दैनंदिन प्रवासी वाहतुकीवर परिणाम होऊ नये म्हणून संबंधित अधिकाऱ्यांना काळजी घ्यायची आहे. प्रवासी वाहतुकीस कुणी बाधा घालत असल्यास स्थानिक पोलीस- गृह रक्षक दलाची मदत घेण्याचेही महामंडळाचे आदेश आहेत. पडळकर हे सेवा शक्ती संघर्ष एस. टी. कर्मचारी संघाचे अध्यक्ष असून सदाशिव खोत हे मुख्य कार्याध्यक्ष आहेत. दोघेही भाजपशी संबंधित असल्याने ते खरेच आंदोलन करणार का, याकडेही सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा >>>शिक्षक की राक्षस! दोन विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक अत्याचार; बुलढाण्याच्या मिलिटरी स्कूलमधील घृणास्पद प्रकार
मुख्यमंत्र्यांकडे भेटायलाही वेळ नाही – खोत
दरम्यान, सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाचे मुख्य कार्याध्यक्ष सदाशिव खोत यांनीही सरकारवर टीका केली आहे. सरकार सत्तेवर येऊन बराच कालावधी झाला. आमदार गोपीचंद पडळकर आणि मी दोन- तीन वेळा परिवहन खाते असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो. परंतु त्यांनी साधी वेळही दिली नाही. हा एसटी कर्मचाऱ्यांवर अन्याय आहे. एसटी कर्मचारी न्यायासाठी आंदोलन करणार असताना मुख्यमंत्र्यांकडे त्यांना भेटायला वेळ नाही. दुसरीकडे आंदोलनात सहभाग घेतल्यास कर्मचाऱ्यांना शिस्तभंगाचा इशारा दिला जात आहे. हे काय चालले आहे, असा प्रश्न खोत यांनी उपस्थित केला आहे.