चंद्रपूर : मूल तालुक्यातील मरेगाव-चितेगाव परिसरात तीन जणांचा बळी घेणाऱ्या वाघिणीला बुधवारी रात्री अथक प्रयत्नांनंतर जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. या वाघिणीने चितेगाव येथील एका तरुणासह तिघांचा जीव घेतला होता.मूल तालुक्यातील सावली-चंद्रपूर वनविभागातील सावली व चिचपल्ली वनपरिक्षेत्रात या वाघिणीने धुमाकूळ घातला होता. सावली परिक्षेत्रात निलेश दुर्गा कोरेवार व शेषराव नागोसे या दोघांचा, तर चिचपल्ली परिक्षेत्रात मेंढपाळ मल्लाजी येगावार यांचा याच वाघिणीच्या हल्ल्यात मृत्यू झाला. तसेच काही नागरिकांना जखमीदेखील झाले होते. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण होते.

दरम्यान, वनविभागाकडून वाघिणीला जेरबंद करण्यासाठी अनेकदा प्रयत्न करण्यात आले. मात्र वाघीण वारंवार वन विभागाला हुलकावणी देत होती. परिणामी नागरिकांमध्ये वन विभागाविषयी रोष वाढत होता. अखेर बुधवारी रात्री सावली वनपरिक्षेत्रात ही वाघीण जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.

ही कारवाई मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक विकास तरसे आणि सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांच्या नेतृत्वात पार पडली. चंद्रपूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी घनश्याम नायगावकर यांनी वाघिणीला बेशुद्ध करण्याचे काम यशस्वीरित्या पार पाडले. यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला असून, वनविभागाचे कौतुक होत आहे.