महावितरणकडून ११ अधिकाऱ्यांची नागपुरात बदली; संचालक (संचलन)कडून अधिकाऱ्यांसह कंत्राटदारांशी चर्चा
नागपूर : महाल, गांधीबाग, सिव्हिल लाईन्स येथील वीजपुरवठा करणाऱ्या ‘एसएनडीएल’ फ्रेंचायझीचा करार रद्द करण्याचे संकेत मिळत आहेत. राज्याच्या विविध भागातील सुमारे ११ अधिकाऱ्यांची महावितरणने नागपुरात बदली केली आहे. महावितरणचे संचालक (संचलन) दिनेश साबू यांनी मंगळवारी एसएनडीएल आणि महावितरणच्या बऱ्याच अधिकाऱ्यांसह कंत्राटदार आणि कर्मचाऱ्यांशी या विषयावर चर्चा करत वीज ग्राहकांना त्रास होऊ नये म्हणून आवश्यक उपाय करण्याच्या सूचना केल्या.
शहरातील साडेपाच लाख ग्राहकांना एसएनडीएलकडून वीजपुरवठा केला जातो. त्यासाठी महावितरणचा एसएनडीएलसोबत करार झाला आहे. एसएनडीएलने नुकतेच महावितरणला पत्र लिहून त्यांची आर्थिक स्थिती ढासळल्याचे सांगितले. पत्रात विलंबाने महावितरणकडे अदा केल्या जाणाऱ्या वीज देयकावरील व्याज व दंड माफ करणे, देखभाल व दुरुस्तीवरील वादग्रस्त निधीचा निपटारा करणे, वीज दर कमी करण्याची मागणी करत येथील जबाबदारी महावितरणने परत घेण्याबाबत अप्रत्यक्षरित्या धमकावले होते. त्यामुळे एसएनडीएलच्या कर्मचाऱ्यांसह कंत्राटदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
या कर्मचाऱ्यांसह कंत्राटदारांनी अचानक कामबंद केल्यास येथील वीज यंत्रणा विस्कळीत होऊ शकते. हा धोका टाळण्यासाठी महावितरणने मंगळवारी ११ अधिकाऱ्यांची नागपुरात बदली केली. महावितरणचे संचालक (संचलन) दिनेश साबू यांनी नागपुरात महावितरणचे नागपूरचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, नोडल अधिकारी दिलीप दोडके यांच्यासह एसएनडीएलचे व्यवसाय प्रमुख सोनल खुराना यांच्यासोबत चर्चा केली. याप्रसंगी साबू यांनी एसएनडीएलला वीज देयक वितरणासह विविध तांत्रिक कामासाठी कर्मचारी पुरवणाऱ्या कंत्राटदारांशीही चर्चा केली. कंत्राटदारांना एसएनडीएल करार रद्द झाल्यावर त्यांची रक्कम संबंधित कंपनीने न दिल्यास महावितरण त्यांच्या जमा रकमेतून देणार असल्याचे आश्वासन दिले गेले. त्यामुळे त्यांनी त्यांच्या सेवा चांगल्या पद्धतीने देण्याची विनंती त्यांनी केली. याप्रसंगी संचालकांनी एसएनडीएलच्या कामगार संघटनेचे मोहन शर्मासह इतरही एसएनडीएलशी संबंधित बऱ्याच लोकांशी चर्चा केली. याप्रसंगी एसएनडीएल कंपनीला एकही बँक कर्ज द्यायला तयार नसून ते कंत्राटदाराला देयक देण्यातही असमर्थ असल्याचा अंदाज महावितरणला आला.
कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या वाचवण्याचे प्रयत्न
एसएनडीएल कंपनीत सध्या १७० सामान्य आणि १५३ तांत्रिक कर्मचाऱ्यांसह बाह्य़स्रोत व इतर अधिकाऱ्यांसह कर्मचारी असे एकूण सुमारे १,२०० अधिकाऱ्यांसह कर्मचारी कार्यरत आहेत. करार रद्द झाल्यास एसएनडीएलच्या कंत्राटदारांनी महावितरणच्या अटी व नियम मान्य केल्यास त्यांच्या सेवांसह इतरची जणांना खासगी कंपनीत घेऊन त्यांचा रोजगार वाचवण्याचे प्रयत्न केले जाईल. सोबत सुमारे एक महिने एसएनडीएल आणि महावितरणची सर्व कामे संयुक्तरित्या या भागात चालणार असल्याचे दिनेश साबू यांनी सांगितले.
- एसएनडीएल’चा प्रवास
* ‘मार्च- २०११’ फ्रेंचायझी धोरण व करारावर स्वाक्षरी
* ‘१ मे २०११’ स्पॅन्कोकडे वीज वितरणाची जबाबदारी
* सप्टेंबर- २०१२ स्पॅन्कोचे नाव बदलून ‘एसएनडीएल’
* एसएनडीएल ही कंपनी एस्सेल ग्रुपने खरेदी केली
* १ मे २०१५ एसएनडीएलच्या चौकशीकरीता गोयनका समिती
* सप्टेंबर- २०१५ अहवालात एसएनडीएल दोषी
* डिसेंबर- २०१५ सुधारणांचे अंकेक्षण
एसएनडीएल फ्रेंचायझीचा करार रद्द करावा की नाही, याबाबत दहा ते पंधरा दिवसांत अंतिम निर्णय होईल. एसएनडीएलची आर्थिक स्थिती वाईट असून त्यांच्या विविध सेवा देणाऱ्या कंत्राटदारांसह इतरही अधिकाऱ्यांशी मंगळवारी चर्चा केली. त्यांना करार रद्दचा निर्णय झाल्यास व त्यांचे देयक कंपनीने न दिल्यास प्रसंगी महावितरण हे देयक अदा करण्याबाबत आश्वासन दिले. नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून महावितण पूर्ण काळजी घेत आहे.
– दिनेश साबू, संचालक (संचलन), महावितरण, मुंबई.