लोकसत्ता टीम
बुलढाणा : मराठवाड्याच्या धर्तीवर कुणबी नोंदी शोधण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातही युद्ध पातळीवर शोध मोहिम राबविण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी किरण पाटील व जिल्हा उप निवासी अधिकारी थोरात यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम राबविण्यात येत आहे. अनुभवी कर्मचाऱ्यांसह तलाठी मंडळ अधिकारी, कोतवाल या संवर्गातील कर्मचारी तपासणीचे काम करीत आहे. दरम्यान या व्यापक मोहिमेसाठी अल्प मुदत देण्यात आल्याने प्रशासन युद्ध पातळीवर कामाला लागल्याचे चित्र आहे. १३ तहसीलमध्ये शेकडो कर्मचारी यासाठी नियुक्त करण्यात आले आहे.व्यापक अंदाजानुसार १० लाखांच्या आसपास जुन्या दस्तावेजची तपासणी करून त्यातील कुणबी नोंदीची माहिती संकलित करण्यात येत आहे. कुणबी नोंदीचे अभिलेखांचे ‘डिजिटायजेशन’ आणि प्रमाणीकरण करावे. मोडी, उर्दू लिपीतील अभिलेखांचे भाषांतर करून ते संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत.
आणखी वाचा-मराठा समाज बांधवांनो जात प्रमाणपत्र हवंय? मग हे करा…
एकट्या बुलढाणा तहसिल कार्यालयासमोर तब्बल लाखभर कुणबी नोंदी तपासाचे आव्हान आहे. तहसीलदार रुपेश खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली गोपालसिंह राजपूत, अतुल झगरे व त्यांचे सहकारी हे काम करीत आहे. मागील १०० वर्षातील पेरेपत्रक, हक्क नोंदणी, कोटवार बुक आदी महसूल अभिलेख( रेकॉर्ड) मधील कुणबी शब्दांच्या नोंदी किती वेळा आहेत, त्याची गणना करण्यात येत आहे. या चमूला मागील १०० वर्षांचे दस्तावेज ‘स्कॅन’ करून देण्यात आले आहे. लाखावर अभिलेखे संगणकावर टाकून ( अपलोड करून) त्यातील पान अन पान तपासावे लागत आहे. रात्रीचा दिवस करून हे काम करण्यात येत आहे. याचा नियमित अहवाल शासनाला कळविण्याचे निर्देश आहेत.