९८ महिलांसह ४८ ग्राहक ताब्यात; अल्पवयीन मुलींचा समावेश; आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहराच्या मध्यवर्ती इतवारी परिसरातील गंगा-जमुना या वेश्या वस्तीवर नागपूर पोलिसांनी आजवरची सर्वात मोठी कारवाई केली. यात पोलिसांनी १६ ते ६० वष्रे वयोगटातील ९८ महिला आणि ४८ ग्राहकांना ताब्यात घेतले आहे. यात मोठय़ा प्रमाणात अल्पवयीन मुलींचा समावेश असून एवढय़ा मोठय़ा प्रमाणात महिला व ग्राहक सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे.

इतवारी परिसरात गंगा-जमूना ही बदनाम झालेली वस्ती आहे. या वस्तीत अल्पवयीन मुलींना आणून त्यांच्याकडून देहव्यापार करविला जातो. याची गुप्त माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक रिना जनबंधू यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर त्यांनी परिमंडळ-तीन अंतर्गत येणाऱ्या सहाही पोलीस ठाण्यातील विश्वासातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना हाताशी धरून मंगळवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास गंगा जमुनावर छापा टाकला. छापा टाकण्यापूर्वी त्यांनी सर्व वस्तीचा अभ्यास केला आणि महिला व ग्राहकांना बाहेर पडण्यासाठी असलेल्या मार्गानुसार सहा चमू तयार केल्या.

वस्तीबाहेर पडण्याच्या सर्व मार्गावर पोलिसांचा ताफा होता. त्यानंतर त्या काही अधिकारी व कर्मचाऱ्यांसह आतमध्ये शिरल्या. वस्तीत पोलीस दाखल होण्याची माहिती एका पानठेला चालकाने सर्व महिलांना दिली. त्यानंतर महिला व मुली बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करीत होत्या. परंतु सर्व रस्त्यांवर पोलीस उभे होते. त्यामुळे महिला व मुली आपापल्या खोलीत शिरल्या आणि बाहेर बसणाऱ्या मावशीकडून दरवाजाला कुलूप लावून स्वत:ला खोलीत बंद करून घेतल्या. त्यानंतर पोलिसांनी जवळपास १५० खोल्यांच्या दरवाजाला लागलेले कुलूप तोडले आणि आतमधून महिला, मुली आणि ग्राहकांना ताब्यात घेतले. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली. त्यानंतर सर्वाना पोलीस वाहनांमध्ये बसवून लकडगंज पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत महिला व ग्राहकांची चौकशी करण्यात येत होती. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या महिलांमध्ये पश्चिम बंगाल, बिहार, उत्तरप्रदेश, राजस्थान येथील सर्वाधिक महिला व मुली आहेत.

या संदर्भात परिमंडळ-३ चे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले की, गुप्त माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली. या वस्तीत बाहेर राज्यातून अल्पवयीन मुलींची तस्करी करून त्यांच्याकडून देहव्यापार करविण्यात येतो. या व्यवसायात आंतरराज्यीय टोळी आहे. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई चालणार असून त्यानंतर घरांना बंद करण्याचे प्रस्ताव वरिष्ठांना सादर करण्यात येतील. या कारवाईसाठी पाचपावलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र हिवरे, लकडगंजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी राजुलवार, अश्विनी वानखेडे, धनराज तिळे यांच्यासह ६० कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले होते.

मुलींना लपविण्यासाठी खोल्यांमध्ये जमिनीत खड्डे

अल्पवयीन मुलींची देहव्यापारात प्रचंड मागणी असते. परंतु अशा मुली सापडल्यास दलाल अडचणीत येतो. त्यामुळे अशा मुली पोलिसांना सापडू नयेत म्हणून त्यांना लपविण्यासाठी अनेक खोल्यांमध्ये जमिनीत एक ते दोन माणसाएवढे खड्डे खोदून ठेवले आहेत. पोलीस कारवाईवेळी या खड्ड्यांमध्ये मुलींना टाकून त्यावर चटई टाकण्यात व इतर सामान ठेवण्यात येते. याशिवाय एका खोलीतून दुसऱ्या खोलीत सहज जाता येईल, मात्र सर्वसामान्य व्यक्तीला न दिसणारे मार्ग तयार करण्यात आले आहेत. शिवाय सर्व परिसरातील वीज पुरवठा केंद्रीय पद्धतीने हाताळण्यात येतो. पोलीस दाखल झाल्यास खोल्यांमधील दिवे बंद करण्यात येतात आणि पोलिसांना दिवे सुरू करेपर्यंत मुली बाहेर पडतात. आजही या क्लृप्त्यांचा वापर मोठय़ा प्रमाणात करण्यात आला.

स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने देहव्यापार

या वस्तीत जवळपास दीड ते दोन हजार महिलांचे वास्तव्य आहे. त्यापैकी ६०० मुली असून त्यापैकी अनेक मुली अल्पवयीन आहेत. तर तेवढय़ाच महिला व्यवसाय करतात. दलाल व्यवसाय करविण्यासाठी एका मुलीमागे दररोजचे ३०० रुपये घेत असल्याची माहिती आहे. या सर्व व्यवसायाची माहिती लकडगंज पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकापासून ते कनिष्ठापर्यंत सर्वाना माहिती आहे. मात्र, पोलिसांकडून त्यांच्यावर कोणतीच कारवाई करण्यात येत नाही. यासाठी पोलीस ठाण्याला वस्तीतून लाखोंचा हप्ता मिळत असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात असून स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादानेच हे सुरू असल्याचे वरिष्ठ अधिकारी एकांतात सांगतात. त्यामुळे लकडगंजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने हे सुटीवर असताना ही कारवाई करण्यात आली आणि एवढय़ा मोठय़ा प्रमाणात यश मिळाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Panic in ganga jamuna after nagpur police raid