लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाशिक: राज्यपाल रमेश बैस हे गुरुवारी नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. या एकदिवसीय दौऱ्यात त्यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या विविध योजनांपासून ते स्वत: ज्या विद्यापीठांचे कुलपती आहेत, त्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे. पीएम आवास, उज्वला, पीएमजीएसवाय, घर घर नल, रोजगार हमी, पीएम किसान, डीबीटी, आश्रमशाळा, डिजिटल कार, गावांची रस्ते मार्गाने जोडणीची स्थिती, कृषी सिंचन, शैक्षणिक पायाभूत सुविधा अशी भलीमोठी यादी राज्यपाल सचिवालयाकडून आल्याने प्रशासनही धास्तावले आहे. याशिवाय वन जमिनी, पेसा कायदा यांचा आढावा घेतला जाईल. रेडक्रॉस संस्थेच्या जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांशीही ते बैठक घेणार आहेत.

राज्यपालांच्या उपस्थितीत जिल्ह्यात प्रथमच अतिशय व्यापक प्रमाणात विविध सरकारी योजनांचा आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळे प्रशासनाची त्या अनुषंगाने माहिती संकलनाची धावपळ सुरू झाली आहे. राज्यपाल सचिवालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयास दौऱ्यात काय अपेक्षित आहे, याची सविस्तर माहिती दिली गेली आहे. १२ ऑक्टोबरला राज्यपाल बैस हे मुंबईहून हेलिकॉप्टरने येणार आहेत. सकाळी १० वाजता प्रथम महाराष्ट्र आरोग्य विज्ञापीठाचा आढावा त्यांच्याकडून घेतला जाईल. नंतर राज्यपाल यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात दाखल होतील. विविध योजनांचा जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेण्यासाठी दुपारची वेळ राखीव आहे. नंतर मुक्त विद्यापीठातील कामकाजाचा आढावा बैस यांच्याकडून घेतला जाणार आहे.

आणखी वाचा-सह्याद्री हजार कोटींची उलाढाल करणारी पहिली शेतकरी कंपनी, २०२२-२३ वर्षात ५० कोटींचा नफा

राज्यपाल सचिवालयाकडून प्रशासनास आलेल्या माहितीनुसार वन हक्क कायद्याची अमलबजावणी, पेसा कायद्यांतर्गत आदिवासी भागातील कामे, याचाही विशेष आढावा घेतला जाईल. या सर्व बैठकीनंतर राज्यपाल इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या जिल्हा शाखेचाही आढावा घेतील. दृकश्राव्य माध्यमातून ही बैठक होईल. त्याची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले आहे. राज्यपालांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने बैठका घेत जय्यत तयारी चालविली आहे. शासकीय यंत्रणांनी राजशिष्टाचाराचे पालन करून काटेकोरपणे नियोजन करावे. राज्यपाल दौऱ्यात वाहतूक व्यवस्थेचे नियोजन, ताफ्यातील वाहनांची प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून तपासणी करण्याची सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केली आहे. शासकीय विश्रामगृह, आरोग्य विज्ञान विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ या ठिकाणी राज्यपालांची भेट प्रस्तावित आहे. त्या अनुषंगाने सुरक्षा व इतर बाबींच्या व्यवस्थेबाबत यंत्रणांना काटेकोर नियोजन करण्यास सांगण्यात आले आहे.

माहिती संकलनाची कसरत

राज्यपाल बैस हे नाशिक दौऱ्यात पंतप्रधान आवास योजना, प्रधानमंत्री उज्वला योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, हर घर जल योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना, प्रधानमंत्री किसान योजना, कृषी योजना, शाळा इमारत, डिबीटी प्रदान लाभ योजना तसेच जिल्ह्यातील आश्रमशाळा, अंगणवाडी यांचा आढावा घेणार आहेत. त्या अनुषंगाने संबंधित विभागांनी याबाबतची माहिती तातडीने विहित नमुन्यात सादर करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक विभागाला केली आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Governor ramesh bais is visiting nashik on thursday mrj