नाशिक : शहरातील पाथर्डी फाटा भागात काही महिन्यांपासून टंचाईला तोंड द्यावे लागत असल्याने संतप्त महिलांनी सिडको विभागीय कार्यालयाच्या पाणीपुरवठा विभागावर हंडा मोर्चा काढून विरोध नोंदवला. अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला. सध्या पाणीपुरवठा विभागात उपअभियंता म्हणून हेमंत पठे यांची नियुक्ती करण्यात आली असून, पूर्वी ते बांधकाम विभागात कार्यरत होते. जुन्या अधिकाऱ्यांच्या ठिकाणी नवीन अधिकारी आले, तरीही परिस्थितीत काहीही सुधारणा झालेली नसल्याचे महिलांचे म्हणणे आहे.
दरवर्षी पाणीपट्टी भरत असतानाही केवळ अर्धा तास पाणी मिळते. अशा परिस्थितीत घरातील अन्य कामे कशी करावी, असा प्रश्न महिलांनी उपस्थित केला. त्यांनी हंडा मोर्चाच्या माध्यमातून प्रशासनाच्या निष्क्रियतेचा तीव्र निषेध नोंदवला. पाथर्डी परिसरात नवीन वसाहती विकसित होत असतानाही पाणीपुरवठ्याची तातडीची व्यवस्था करण्यात सिडको मनपा प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता हेमंत पठे हे कार्यालयात अनुपस्थित होते, यामुळे नागरिकांमध्ये अधिक संताप निर्माण झाला. महिलांनी अधिकाऱ्यांना निवेदन देत तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.