नाशिक – नदीच्या सौंदर्यीकरणापेक्षा प्रशासनासह पर्यावरण प्रेमींनी दिर्घकालीन उपाययोजना कराव्यात. पर्यटनापेक्षा तीर्थाटनाच्या अंगाने नाशिकची विकासकामे व्हावीत, अशी सूचना जलतज्ज्ञ डाॅ. राजेंद्र सिंह यांनी केली आहे. महापालिका मुख्यालयात ‘चला जाणूया नदीला’ अभियानांतर्गत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचे अशासकीय सदस्य (विशेष आमंत्रित) डाॅ. सिंह यांनी बैठकीत नदी प्रदुषण रोखण्याच्या अंगाने मार्गदर्शन केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाशिक शहर पर्यटनापेक्षा तीर्थाटनासाठी ओळखले जाते. तीर्थाटनाच्या अनुषंगाने शहराची विकासकामे करणे योग्य राहील, असे सिंह यांनी सांगितले. गोदावरीचा नैसर्गिक प्रवाह थांबला आहे. नदी बारमाही कशी प्रवाहित करता येईल, याबाबत पुढील आराखडा तयार करणे गरजेचे आहे, नदीच्या सौंदर्यीकरणापेक्षा दिर्घकालीन उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी नमूद केले. शासकीय आणि अशासकीय सदस्यांच्या माध्यमातून शासनाने अभियानाला गती देऊन चांगले काम केले आहे. बुलढाण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी धरणातील गाळ काढण्याची मोहीम यशस्वी केली होती. त्या कामाचे कौतुक करून आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांच्याकडून नाशिकमध्येही नदी स्वच्छतेबाबत विशेष कामाची अपेक्षा डाॅ. सिंह यांनी व्यक्त केली.

हेही वाचा – “संजय राऊत हे दात काढलेले वाघ”; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून खिल्ली

आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी गोदावरी प्रदूषणमुक्त राहण्यासाठी अभियान यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला. नदी स्वच्छतेबाबत काम करणाऱ्या संस्था आणि अबालवृद्धांच्या सहभागातून मनपा उपाययोजना करेल, शहरातील नाल्यांचे पाणी गोदावरीत जाणार नाही, असा प्रयत्न राहील. शहरातील इमारतींसाठी ‘रुफ वॉटर हार्वेस्टिंग’ची कडक अंमलबजावणी केली जाईल, अशी ग्वाही आयुक्तांनी दिली.

बैठकीच्या प्रारंभी विभागीय वनाधिकारी पंकज गर्ग यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर मनपाकडून गोदावरी नदी आणि उपनद्यांचे संवर्धन आणि प्रदूषण रोखण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांची माहिती देण्यात आली. प्रस्तावित ‘नमामि गोदा’ प्रकल्पातील संक्षिप्त बाबींचे सादरीकरण करण्यात आले. ज्यामध्ये प्रामुख्याने नदीचे प्रदूषण कमी करण्याच्या उपाययोजना, सौंदर्यीकरण व प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर या गोष्टींचा समावेश होतो. मनपाच्या सल्लागार कंपनीने यावेळी सादरीकरण केले. मनपाचे सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे आठ प्रकल्प, १६ नाले यासह प्रस्तावित उपाययोजनांची माहिती देण्यात आली. या कंपनीला सहा महिन्यांत प्रकल्प अहवाल मनपाला सादर करावयाचा आहे. या सादरीकरणानंतर अभियानाचे राज्य समन्वयक राजेश पंडित यांनी अभियानांतर्गत केलेल्या अभ्यासाचा गोषवारा सांगून संवाद यात्रेला सुरुवात केल्याचे सांगितले.

हेही वाचा – मालेगावात ‘वॉटर ग्रेस’विरुद्ध गुन्हा; कचरा संकलनात फसवणूक

बैठकीला गोदावरी संवर्धन कक्षाचे प्रमुख तथा उपायुक्त विजयकुमार मुंढे, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके, उदय धर्माधिकारी, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड, अभियानाचा दूत अभिनेता चिन्मय उद्गीरकर, राह फाउंडेशनचे शरयू कामत, सत्संग फाउंडेशनचे अमेय नातू, ओलगा, हेल्पिंग हँड फाउंडेशनचे उदय पानसरे, पर्यावरणप्रेमी चंद्रकांत पाटील, अभिनेते किरण भालेराव, जनसंपर्क अधिकारी गिरीश निकम उपस्थित होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Need for long term solutions instead river beautification suggestion by rajendra singh in nashik ssb