नंदुरबार : शहरापासून १० ते १५ किलोमीटरवर असलेल्या रनाळे जळखे परिसरात रेल्वे रुळावरुन मालगाडी घसरल्याची बातमी शुक्रवारी दुपारी आली आणि यंत्रणेची धावपळ उडाली. पोलिसांसह सर्वांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्व विभाग आपआपल्या पध्दतीने कार्यरत झाले असताना हा यंत्रणेची तयारी पाहण्यासाठी केलेला सराव असल्याचे उघड झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रेल्वेमार्गावर नंदुरबारपासून सुरतच्या दिशेने निघालेल्या एका मालगाडीचे डबे घसरल्याच्या बातमीने यंत्रणांची चांगलीच त्रेधातिरपीट उडवली. ही मालगाडी इंधन वाहून नेणारी असल्याची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा दल, रेल्वेचे अधिकारी, लोहमार्ग पोलीस घटनास्थळाकडे तातडीने रवाना झाले. रनाळे जळखे गावानजीक असलेल्या बोगद्याजवळ मालगाडी दुपारी तीन वाजेपासून उभी करण्यात आली. याठिकाणी सर्व यंत्रणा पोहचल्यानंतर रेल्वेच्या वरिष्ठ स्तरावरुन याठिकाणी सराव घेण्यात आल्याचे समजले. त्यामुळे यंत्रणांनी काहीसा सुटकेचा श्वास सोडला.

हे ही वाचा…नाशिक : बोरगावात रुग्णवाहिकेसाठी आंदोलन

मुळात सध्या रेल्वे रुळावर होत असलेले घातपात आणि अपघात पाहता माहिती मिळताच सर्व यंत्रणा किती सतर्क होवून घटनास्थळी पोहचतात, याची तपासणी या सरावातून झाली. गोपनीय पद्धतीने घेतलेल्या या चाचणीबद्दल सारेच अवाक झाल्याचे पहावयास मिळाले. तब्बल दोन तासानंतर थांबवण्यात आलेली इंधन मालगाडी सुरतकडे रवाना झाली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: News of goods train falling off on railway track came out on friday to see readiness of system in nandurbar sud 02