हजारो शेतकऱ्यांची फौज घेऊन बुलढाणा येथून निघालेले शेतकरी नेते रविकांत तुपकर आज गुरुवारी सकाळी मुंबईत दाखल झाले. दरम्यानच्या नाट्यमय घडामोडीत आंदोलनाची गांभीर्याने दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविकांत तुपकर यांना चर्चेसाठी सह्याद्री अतिथीगृहावर निमंत्रित केले आहे. या बैठकीतील चर्चेवर आंदोलनाची पुढील दिशा ठरणार असल्याचे तुपकर यांनी स्पष्ट केले असून अरबी समुद्र अजूनही वाट बघतोय, अशा सूचक शब्दात शेतकऱ्यांनी आपला निर्धार कायम ठेवला आहे.
आज २४ नोव्हेंबरला दुपारी अडीच वाजता रविकांत तुपकर व शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीसाठी रविकांत तुपकर पनवेल येथून मुंबईत आले होते. मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली तर ठीक, अन्यथा आंदोलनाच्या भूमिकेवर कायम असल्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी कार्यकर्त्याना संबोधित करताना दिला आहे.