पनवेल : तळोजा मध्यवर्ती कारागृहातील २९६८ कैदी आणि बंदींच्या हालचालींवर यापुढे एआयच्या मदतीने ४५१ तिसर्या डोळ्यांची नजर असणार आहे. सोमवारी राज्याचे कारागृह व सुधारसेवा विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक व महानिरिक्षक अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते कळ दाबून तळोजा मध्यवर्ती कारागृहातील सीसीटिव्ही कॅमेरा नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला. यावेळी कारागृह उपमहानिरिक्षक योगेश देसाई, कारागृह अधीक्षक प्रमोद वाघ, उपअधीक्षक महादेव पवार, जितेंद्र काळे, तुरुंगाधिकारी राहुल झुटाळे कर्मचारी उपस्थित होते. मागील अनेक महिन्यांपासून राज्यातील सर्वच कारागृहामधील कारभारामध्ये पादर्शकता आणण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरांचे जाळे बसविण्यासाठी अप्पर पोलीस महासंचालक गुप्ता यांनी पुढाकार घेतला असून याच पुढाकाराच हा एक भाग असल्याची माहिती गुप्ता यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली. हेही वाचा.नवी मुंबईतील घणसोली गावात रोहित्राला आग…पावसाने झाले शॉर्ट सर्किट तळोजा कारागृहामध्ये क्षमतेपेक्षा अधिक बंदी आणि कैदी असल्यामुळे कारागृहातील बंदींच्या सूरक्षेसोबत पोलीस कर्मचारी आणि बंदी यांच्यातील वाद न्यायालयात अनेकदा मांडले जातात. त्यावेळी सीसीटिव्ही कॅमेराच्या मदतीने नेमके त्यावेळी काय घडले याचे चित्रिकरण या सीसीटिव्ही कॅमेरांमध्ये टिपलेले असेल. कारागृह सूधारसेवेत जास्तीत जास्त पारदर्शकता आणण्याचा सरकारचा मानस असल्याने ही योजना अंमलात आणल्याचेही गुप्ता म्हणाले. तसेच यापुढे व्हीडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे बंदी व त्यांच्या नातेवाईकांना संपर्क साधण्यासाठी नवीन १५ व्हीडीओ कॉन्फरन्सिंग सेट सुद्धा लावण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती अप्पर महासंचालक गुप्ता यांनी दिली. बंदींची कारागृहाच्या प्रवेशद्वारावर अंगझडती घेण्यासाठी बॉडी स्कॅनर यंत्र कारागृहाला दिल्याचे यावेळी अप्पर महासंचालकांनी सांगितले. हेही वाचा.नवी मुंबई: गवळीदेव डोंगर पावसाळी सहलीने बहरला नेमका सीसीटिव्ही कॅमेरांचे जाळे बसविण्यासाठी तसेच विविध उपकरणांसाठी किती खर्च झाला याची माहिती देणे अप्पर पोलीस महासंचालकांनी टाळले. परंतू गुप्ता यांनी कारागृह व सूधारसेवा विभागाची सूत्रे हाती घेतल्यापासून राज्यातील प्रत्येक कारागृहातील कामकाजामध्ये पारदर्शक येण्यासाठी विविध आधुनिक तंत्रज्ञानाच्या सेवा कशा पुरविल्या जातील यासाठी प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.सध्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात नक्षलवादी टोळीतील १० तर १९९३ बॉम्बब्लास्ट १ अशा गंभीर गुन्ह्यातील अनेक बंदी व कैदी येथे आहेत.