आयुक्त तुकाराम मुंढे यांचे स्पष्टीकरण; ‘वॉक विथ कमिशनर’ अभियानांतर्गत माहिती
तुर्भे कचराभूमीच्या सहाव्या सेलची क्षमता संपेपर्यंत ही कचराभूमी सुरूच राहील, अशी माहिती पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली. वाशी येथील वीर सावरकर उद्यनात आयोजित ‘वॉक विथ कमिशनर’ या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
तुर्भे नाका, हनुमान नगर, तुर्भे स्टोअर येथील झोपडपट्टय़ांतील रहिवासी व तुर्भे एमआयडीसीतील कंपन्यांमधील कामगारांना गेल्या काही वर्षांपासून तुर्भे क्षेपणभूमीचा मोठय़ा प्रमाणात उपद्रव सहन करावा लागत आहे. येथील घटकांना वायुप्रदूषणासह अन्य आजारांनाही सामोरे जावे लागत आहे. श्वसनाच्या विकारांसह त्वचाविकार होत आहेत. या कचराभूमीच्या दरुगधीचा त्रास येथील रहिवाशांना सुरुवातीपासूनच होत होता; मात्र प्रशासनाने त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना केल्याचा दावा केला होता. त्यानंतर काही काळ हे प्रकरण थंड झाले होते. आता वर्षभरापासून क्षेपणभूमीबाबत नागरिकांच्या तक्रारी पुन्हा सुरू झाल्या आहेत.
ही क्षेपणभूमी प्रशासनाने लवकर बंद केली नाही तर आपण तीव्र आंदोलन करू असा इशारा येथील लोकप्रतिनिधींनी दिला होता. या मुद्दय़ावरून दोनदा स्थायी समिती व महासभेतही सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक आक्रमक झाले होते. त्यांनी अनेक तास सभागृहात चर्चा केली होती. इतकेच नव्हे, तर आमदार मंदा म्हात्रे व संदीप नाईक यांनीही तुर्भे कचराभूमीमुळे तेथील रहिवासी आजारी पडत असल्याने ही क्षेपणभूमी बंद करण्यात यावी, अशी मागणी केली होती. मंदा म्हात्रे यांनी नुकतीच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन याचे गांभीर्य विशद केले. त्यांनीही लवकरच यावर सकारात्मक निर्णय घेऊ , असे आश्वासन म्हात्रे यांना दिले आहे. या सर्व पाश्र्वभूमीवर आज पत्रकारांनीही आयुक्तांना येथील नागरिकांच्या व्यथा निदर्शनास आणून दिल्या. या प्रकरणी प्रशासनाची काय भूमिका असेल, असे विचारले. त्यावर मुंढे यांनी तुर्भे येथील कचराभूमीमुळे आजार पसरत असल्याचा दावा चुकीचा आहे. रहिवासी कांगावा करत आहेत.
पाचव्या सेलची कचरा टाकण्याच्या स्तराची क्षमता अद्याप संपलेली नाही. आणखी सहावा सेलही बाकी आहे. त्यामुळे या सहाव्या सेलची क्षमता संपेपर्यंत कचरा तेथेच टाकला जाणार आहे. एकच सेल शिल्लक राहिल्याने आम्ही आधीच क्षेपणभूमीसाठी अन्य ठिकाणी जागेची मागणी केली आहे, अशी माहिती मुंढे यांनी या वेळी दिली.