उरण : मोरा ते मुंबई व अलिबाग ते उरण दरम्यानची करंजा रेवस या उरणच्या जलप्रवास मार्गावरील बोटी समुद्रात आलेल्या वादळीवाऱ्यामुळे हवामान विभागाने धोक्याचा लाल बावटा फडकविल्याने प्रवाशांसाठी बंद करण्यात आल्या आहेत. सोमवारी उशिरापासून बंद करण्यात आलेली या दोन्ही मार्गावरील जलवाहतूक धोक्याचा इशारा दूर होईपर्यंत सुरू होणार नसल्याचे संकेत बंदर विभागाने दिले आहेत. मात्र ही दोन्ही मार्गांवरील जलवाहतूक बंद झाल्याने चाकरमान्यांची गैरसोय झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उरण ते मुंबई असा प्रवास करण्यासाठी मोरा ते मुंबईतील भाऊचा धक्का अशी जलसेवा आहे. ही जलसेवा पावसाळ्यातही सुरू असते. पावसाळ्यात या मार्गावरील बोटींच्या फेऱ्या कमी असल्याने तसेच प्रवासीसंख्याही रोडावते. त्यामुळे जलप्रवासाच्या तिकीट दरात वाढ केली जाते. मात्र तरीही दररोज मुंबईत नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने ये-जा करणारे शेकडो प्रवासी आहेत. तर दुसरीकडे उरण ते अलिबाग दरम्यान प्रवासासाठी रेवस ते करंजा दरम्यानची जलसेवा आहे. या जलसेवेचा उपयोग दोन्ही तालुक्यांतील कामगार, व्यावसायिक तसेच आपल्या कार्यालयीन कामकाजानिमित्ताने अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ये-जा करणारे प्रवासी करीत असतात.

मात्र मागील दोन दिवसांपासून वेगवाने वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे प्रवासी बोटीने प्रवास करणे धोकादायक असल्याने ही सेवा सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आली आहे. मोरा ते मुंबई दरम्यानची जलसेवा ही हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर बंद करण्यात आली असून धोक्याचा इशारा मागे घेतल्यानंतर ही सेवा पूर्ववत सुरू करण्यात येईल, अशी माहिती मोरा बंदर अधिकारी प्रकाश कांदळकर यांनी दिली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water traffic stopped due to storm amy