डॉ. विवेक पाटकर
लक्षणांचे वर्णन केल्यास संसर्गजन्य रोगाचे निदान करण्यासाठी एडवर्ड फायगनबॉम यांनी १९६५मध्ये ‘मायसिन’ ही तज्ज्ञ प्रणाली (एक्स्पर्ट सिस्टीम) विकसित केली. तिने वैद्यकीय क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता वापराची मुहूर्तमेढ रचली असे मानले जाते. त्या प्रणालीत तशा विशिष्ट रोगांची लक्षणे, निदान पद्धती, गुणकारी औषधे इत्यादी उपलब्ध सर्व माहिती साठवून ठेवली होती. डॉक्टर जसे रुग्णाला काही प्रश्न विचारतो तसे ते या प्रणालीच्या संगणकाच्या पटलावर उमटत. त्यांची दिलेली टंकलिखित उत्तरे संग्रहित माहितीसाठ्यातील माहितीशी ताडून पाहिली जात आणि विश्लेषण करून रोगाचे निदान पटलावर दर्शविले जात असे. त्यानंतर उपचारासाठी औषधे, ती घेण्याचा क्रम, होऊ शकणारे सहपरिणाम तसेच आहाराबाबत सूचना मिळत. आता असा संवाद मौखिकही होऊ शकतो. गेल्या सहा दशकांत रोगनिदानासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित कित्येक रोगविशेष तज्ज्ञ प्रणाली विकसित झाल्या आहेत. ‘सीझ’ ही एपिलेप्सी म्हणजे फेफरं यांचे निदान करणारी, तसेच ‘मायक्रोस्ट्रोक’ ही पक्षाघाताशी निगडित तज्ज्ञ प्रणाली, ही त्याची उदाहरणे. भविष्यात, प्रत्यक्ष डॉक्टरऐवजी अशी प्रणाली रुग्णांचे पहिले निदान करेल असे संकेत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेशी जुळवून घेताना…

वैद्यकीय सेवा क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. यंत्रमानवी हाताच्या मदतीने शस्त्रक्रिया करण्यात मोठी मजल मारली गेली आहे. कारण शरीराच्या अगदी अडचणीच्या भागात आणि स्थिरपणे ते यांत्रिक हात लहान-मोठे करत नेणे शल्यविशारदाला (सर्जन) सोपे होते. या पद्धतीने २००० साली एक हजार तर २०२३ सालापर्यंत एक कोटी १० लाख शस्त्रक्रिया पार पाडल्या गेल्या असे आकडेवारी सांगते. भविष्यात अशा यंत्रणा स्वतंत्रपणे काही प्रकारच्या शस्त्रक्रिया करू शकतील, असा अंदाज आहे, मात्र या प्रकारे केलेल्या शस्त्रक्रियेमुळे दोष निर्माण झाल्यास शल्यविशारद की यांत्रिक उपकरण म्हणजे ती निर्माण करणारी कंपनी की, त्याचे सॉफ्टवेअर लिहिणारा तंत्रज्ञ यांच्यापैकी कोणाला जबाबदार धरावे असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो.

विविध वैद्यकीय चित्रांकन प्रणालींची (उदा. सोनोग्राफी, एफएमआरआय स्कॅनिंग) क्षमतावृद्धी आणि अर्थ काढण्यात यंत्र स्वअध्ययन आणि विदा विज्ञान यांची मोठी मदत होत आहे. तसेच विशिष्ट रुग्णांना सेवा पुरविण्याचे नियोजन आणि पाठपुरावा करणाऱ्या वैद्यकीय प्रणालीही असून त्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विविध घटकांचा वापर करतात.

हेही वाचा : कुतूहल : बुद्धिमत्तेची कुरघोडी

मूलभूत आणि उपयोजित वैद्यकीय संशोधन, चिकित्सालयीन चाचण्या, औषधनिर्मिती, वैद्यकीय उपकरणांची निर्मिती या सर्व बाबतीतही कृत्रिम बुद्धिमत्ता कळीची भूमिका बजावत आहे.

डॉ. विवेक पाटकर
मराठी विज्ञान परिषद
ईमेल: office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Artificial intelligence in medical field css