कृत्रिम बुद्धिमत्तेची सर्व क्षेत्रांत घोडदौड सुरू आहे. निक बॉस्त्रॉम् या तत्त्ववेत्त्याने त्यापासून निर्माण होणाऱ्या अस्तित्वाच्या जोखमीचे तत्त्व सांगत, धोक्याचा लाल कंदील दाखवला आहे.

निक बॉस्त्रॉम् यांचा जन्म १० मार्च १९७३ रोजी स्वीडन येथे झाला. घरून शिक्षण घेत त्यांनी मानववंशशास्त्र, कला, साहित्य आणि विज्ञान यासह अनेक शैक्षणिक क्षेत्रांत प्रगती केली. त्यांचे शिक्षण युनिव्हर्सिटी ऑफ गोथेनबर्ग (बीए, तत्त्वज्ञान), स्टॉकहोम विद्यापीठ (एमए, भौतिकशास्त्र), किंग्स कॉलेज लंडन (एमएससी, संगणक न्यूरोसायन्स) आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (पीएच.डी., तत्त्वज्ञान) मध्ये झाले. येल विद्यापीठात त्यांनी अध्यापकाचे पदही भूषविले. सध्या ते ऑक्सफर्ड विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक आहेत.

या चौफेर ज्ञानप्राप्तीत त्यांच्या पुढील कामाची बीजे रोवली गेली. ते मुख्यत: १) अस्तित्वाची जोखीम २) अनुकार पद्धती (सिम्युलेशन) ३) मानववंशशास्त्र ४) भविष्यातील तंत्रज्ञानाचे परिणाम ५) परिणामवादाचे जागतिक धोरणावर होणारे परिणाम याकरिता प्रसिद्ध आहेत. त्यांनी तत्त्वज्ञान, संगणक, कृत्रिम बुद्धिमत्ता या सर्वांची सांगड घालून मानवतेचे भवितव्य आणि होणाऱ्या विघातक दीर्घकालीन परिणामांविषयी जगाला जागरूक केले आहे. त्यांनी प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता, आण्विक अतिसूक्ष्मतंत्रज्ञान आणि कृत्रिम जीवशास्त्र यांचेही दुष्परिणाम सांगितले आहेत. त्यामुळे मानवी संस्कृतीचा मूलभूतरीत्या नाश होऊ शकेल आणि मानवाचे अस्तित्वच जोखमीचे होऊ शकेल. बॉस्त्रॉम् यांनी असुरक्षा वर्गीकरण आणि ते हाताळण्यासाठी एक सैद्धांतिक चौकटसुद्धा प्रस्तावित केली आहे.

हेही वाचा >>> कुतूहल : ग्रंथालयात कृत्रिम बुद्धिमत्ता – ज्ञानकेंद्रात रूपांतर

२००२ मध्ये त्यांनी ‘अँथ्रोपिक बायस : ऑब्झर्वेशन सिलेक्शन इफेक्ट्स इन सायन्स अँड फिलॉसॉफी’ हे पुस्तक प्रकाशित केले. ‘सुपर इंटेलिजन्स : पाथ, डेंजर’ (२०१४) या पुस्तकात ते म्हणतात की, सुपर इंटेलिजन्समध्ये कोणतीही बुद्धी जी मानवाच्या सर्व प्रकारच्या स्वारस्याच्या क्षेत्रांमध्ये संज्ञानात्मक कार्यक्षमतेपेक्षा जास्त आहे, हाच अस्तित्वातील जोखमीचा प्रमुख स्राोत आहे. प्रगत कृत्रिम बुद्धिमत्तेबरोबर जर नीतिमत्ता अंतर्भूत केली तरच मानवाला त्यापासून असलेला धोका कमी होईल. विघातक परिणाम नियंत्रित करण्यास प्रतिबंध, कृत्रिम बुद्धिमत्तेची क्षमता आणि ज्ञान खुंटविणे, कार्यरत संदर्भ कमी करणे असेही उपाय ते सुचवतात.

मानवी संस्कृतीच्या दीर्घकालीन भविष्यावर संशोधन करण्यासाठी २००५ मध्ये त्यांनी ‘फ्युचर ऑफ ह्युमॅनिटी इन्स्टिट्यूट’ची स्थापना केली. ते ‘सेंटर फॉर द स्टडी ऑफ एक्झिस्टेन्शियल रिस्क’ या संस्थेचे सल्लागार आहेत. त्यांना ऑक्सफर्ड विद्यापीठातर्फे प्रोफेशनल डिस्टिंक्शन अॅवॉर्ड देण्यात आले आहे.

डॉ. अनला पंडित

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ:www.mavipa.org