संगणकाचा शोध लावताना एक अत्यंत जलद आणि अचूक गणन करणारे यंत्र ही त्याच्याकडून अपेक्षा होती आणि ती त्याने पूर्णही केली. संगणकाचा जसजसा विकास झाला तसतशी माणसाच्या त्याच्याकडून अपेक्षाही वाढत गेल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रोग्रॅमरने दिलेल्या आज्ञावलीबरहुकूम काम करणारा संगणक स्वत:च आज्ञावली लिहू शकेल का, असा विचार होऊ लागला. माणूस हा सृष्टीतील इतर सर्व प्राण्यांप्रमाणे सर्व स्रोतांतून त्याला मिळणाऱ्या माहितीचे ग्रहण आणि विश्लेषण करतो आणि त्यावर विचार करून त्याच्या अनुभवावर आधारित, त्याला योग्य वाटेल तो निर्णय घेतो. अशाच पद्धतीने संगणकसुद्धा निर्णय घेऊ शकेल, असे तज्ज्ञांना वाटू लागले.

आजवर संगणकाच्या सर्व भागांमध्ये सर्वागीण प्रगती झाली आहे. इनपुट आणि आऊटपुट युनिट्सच्या संख्येमध्ये प्रचंड भर पडली आहे. मानवी हस्तक्षेपाशिवाय अनेक स्मार्ट यंत्रे संगणकाशी थेट बोलू लागली आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून प्रचंड विदा उपलब्ध झाली आहे. संगणकाच्या विदेवर प्रक्रिया करायच्या शक्तीत आणि वेगात अफाट वाढ झाली आहे. क्लाऊडवर माहिती ठेवण्याच्या तंत्रज्ञानामुळे जगातील कोणत्याही ठिकाणाहून ही विदा उपलब्ध होऊ शकते.

या पार्श्वभूमीवर संगणकाला बुद्धिमत्ता देण्यासाठी अशी सॉफ्टवेअर्स लिहिली जात आहेत, जी वापरून मानवाप्रमाणे संगणकही या सर्व विदेचे विश्लेषण करून स्व:तच निर्णय घेऊ शकतील. यालाच

आपण ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ म्हणतो. कोणताही मानव करू शकणार नाही इतक्या प्रचंड विदेचे ग्रहण आणि विश्लेषण क्षणार्धात करून निर्णयाप्रत

येण्यात संगणक माणसापेक्षा सरस ठरला आहे.

‘इंटरनेट ऑफ थिंग्स’सारख्या तंत्रज्ञानाच्या मदतीने तो निर्णय मानवी हस्तक्षेपाशिवाय इतर स्मार्ट यंत्रांच्या मदतीने अमलात आणणेही संगणकाला आज सहज शक्य झाले आहे.

आजच्या घटकेला काही कामांत असा बुद्धिमान संगणक माणसाला अत्यंत सशक्त पर्याय म्हणून उभा राहिला असला, तरी माणसाची सर्व कामे करण्यास आज तरी तो समर्थ नाही.  आजच्या घडीला मानवासारखी किंबहुना मानवाहूनही सरस गणिती-तार्किक, भाषिक, अवकाश-कालात्म आणि सांगीतिक बुद्धिमत्ता संगणक आज अनेक क्षेत्रात प्राप्त करू शकत असला, तरी मानवाला उपजत असलेले शारीरिक, नैसर्गिक, भावनिक-बाह्य, अंतर्गत, अस्तित्वनिष्ठ बुद्धिमत्तेचे क्षेत्र आजतरी त्याच्या कक्षेच्या बाहेर आहे. मानवी मेंदू आणि स्मृती याला पर्याय देणारा हा हुशार संगणक अजून तरी मानवी मनाला पर्याय देण्यास असमर्थ ठरला आहे. कालचा ‘हुशार सांगकाम्या’ आज तरी ‘हृदयशून्य विद्वान’ झाला आहे. उद्या कदाचित यातही बदल होऊ शकेल.

मकरंद भोसले, मराठी विज्ञान परिषद

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta kutuhal the invention of the computer precision calculator input and output units amy