बोईसर एमआयडीसी पोलीस तणावात ; लोकसंख्येसह गुन्हेगारीत वाढ; गंभीर गुन्ह्य़ांचे प्रमाण ३५ टक्के 

तारापूर एमआयडीसी पोलीस ठाणे अंतर्गत औद्योगिक वसाहत आणि आजूबाजूच्या २९  गावांचा समावेश आहे

बोईसर एमआयडीसी पोलीस तणावात ; लोकसंख्येसह गुन्हेगारीत वाढ; गंभीर गुन्ह्य़ांचे प्रमाण ३५ टक्के 

विनायक पवार, लोकसत्ता

बोईसर:  तारापूर औद्योगिक वसाहत व लगतच्या बोईसर परिसरात वाढते नागरीकरण आणि वाढती लोकसंख्याबरोबर गुन्हेगारीत देखील वाढ होत असून  एकूण गुन्ह्य़ांपैकी ३५ टक्के गुन्हे हे गंभीर स्वरुपाचे आहे.  यामध्ये प्रामुख्याने खून, खुनी हल्ला, चोरी, संघटित गुन्हेगारी, बाललैंगिक अत्याचार  आदी गुन्ह्यांचा समावेश आहे. लोकसंख्येच्या तुलनेत पोलीस बळ अपुरे असल्यामुळे  या वाढत्या गुन्ह्य़ांचा तपास करणे कठीण जात असून  त्यामुळे या भागात आणखी एक नवे पोलीस ठाण्याची अपेक्षा  पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.

तारापूर एमआयडीसी पोलीस ठाणे अंतर्गत औद्योगिक वसाहत आणि आजूबाजूच्या २९  गावांचा समावेश आहे. यामध्ये बोईसरसारख्या शहरी भागासोबतच पूर्वेकडील ग्रामीण भाग समाविष्ट असून लोकसंख्या अंदाजे तीन लाखांपेक्षा अधिक आहे. तारापूर औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांमध्ये सातत्याने स्फोट, आग, वायुगळती आणि इतर अपघाताच्या घटना घडत असतात. अशा वेळी पोलिसांना अग्निशमन दलाच्या सोबत स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करावे लागते. त्याचप्रमाणे वेळोवेळी होणाऱ्या कामगार आंदोलनाच्या दरम्यान परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांची कसोटी लागते. एमआयडीसी पोलीस ठाणेअंतर्गत औद्योगिक वसाहतीसह  लगतच्या  बोईसर, सरावली, खैरापाडा, कोलवडे, कुंभवली, सालवड, बेटेगाव, मान आणि वारांगडे या मोठय़ा प्रमाणात नागरीकरण झालेल्या ग्रामपंचायतीसह पूर्व भागातील सूर्या नदी अल्याड गावांचा देखील समावेश आहे. एका बाजूला शहरी भाग तर दुसऱ्या बाजूला दुर्गम डोंगराळ भाग अशा विपरीत परिस्थितीत कायदा- सुव्यवस्था आणि गुन्हेगारी रोखण्याचे काम पोलिसांना करावे लागते. पोलीस ठाण्यामध्ये एकूण गुन्ह्य़ांपैकी महिन्याला ३५ टक्के गंभीर गुन्ह्य़ांची नोंद होत असून   गुन्हेगारीच्या घटना सातत्याने वाढतच आहेत.  अदखलपात्र गुन्हे वगळता दखलपात्र गंभीर गुन्ह्य़ांचे प्रमाण हे वाढते असून यामध्ये प्रामुख्याने खून, खुनी हल्ला, चोरी, संघटित गुन्हेगारी, बाललैंगिक अत्याचार आदी गुन्ह्यांचा समावेश आहे. पुढील दोन-तीन वर्षांत बोईसर पूर्वेला मुंबई-अहमदाबाद हायस्पीड मार्गावरील बुलेट ट्रेनचे स्थानक होणार असून यामुळे कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांवर अतिरिक्त ताण पडणार आहे.

स्वतंत्र बोईसर पोलीस ठाण्याची मागणी

सध्याच्या एमआयडीसी पोलीस ठाणे अंतर्गत औद्योगिक परिसर, कोलवडे, कुंभवली, सालवड हा भाग कायम ठेवून नवीन बोईसर पोलीस ठाणेअंतर्गत उर्वरित बोईसर, सरावली, खैरापाडा, बेटेगाव, मान, वारांगडे, राणीशिगाव, नेवाळे सहित रेल्वेच्या पूर्वेकडील सूर्या नदीच्या हद्दीपर्यंत असलेली गावे समाविष्ट केल्यास सध्याच्या पोलीस ठाण्यावरील भार बराचसा हलका होऊन पोलिसांच्या तपासाच्या कार्यक्षमतेत देखील वाढ होऊन कायदा सुव्यवस्था राखण्यास मदत होऊ  शकते, असे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्याची रचना

बोईसर एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत बोईसर रेल्वे स्थानक, चित्रालय, खैरापाडा, कुंभवली आणि बेटेगाव अशा पाच बीट चौक्या आहेत. सर्व मिळून एकूण १०२ पदे अस्तित्वात आहेत. यामध्ये एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एक साहाय्यक पोलीस निरीक्षक, पाच पोलीस उपनिरीक्षक व ९५ कर्मचारी यांचा समावेश आहे.  पोलीस ठाणे अंतर्गत  बीट ०५, चेकपोस्ट ०१, ग्रामपंचायत १६, मंदिरे ६०, मस्जिद ०२, मदरसे १६, चर्च ०२, रुग्णालये ४१, हॉटेल्स ३७, ढाबे ०४, शाळा ६०, महाविद्यालये ०५, चित्रपटगृह ०१, पेट्रोल पंप ०६ आणि १२०० कारखाने येतात.

तारापूर औद्योगिक वसाहत आणि  बोईसर परिसरात शहरीकरण वेगाने होत आहे. त्यामुळे लोकसंख्या झपाटय़ाने वाढत असल्याने गुन्हेगारी आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण  होऊन त्याचा ताण पोलिसांवर पडत आहे. या संदर्भात नवीन बोईसर पोलीस ठाणे निर्माण करण्याची मागणी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे करणार आहे. त्याचप्रमाणे विधानसभा अधिवेशनात देखील हा मुद्दा उपस्थित करणार आहे.  – राजेश पाटील, आमदार, बोईसर विधानसभा

बोईसर एमआयडीसी पोलीस ठाणे अंतर्गत सध्या वाढती लोकसंख्या लक्षात घेता कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी वाढीव पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक लवकरच करणार आहोत.  – बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
विकासनिधीत दुजाभाव ; सदस्यांना दूर ठेवत जिल्हा परिषदेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये निधी वाटप
फोटो गॅलरी