जलशुद्धीकरण यंत्रणा नादुरुस्त; नगरपंचायत व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

वाडा : गेल्या सात वर्षांपासून वाडा शहरातील नागरिकांना पावसाळ्यातील चार महिने गढूळ पाणी प्यावे लागते. येथील नादुरुस्त असलेली जलशुद्धीकरण यंत्रणा दुरुस्तीसाठी अथवा नव्याने उभारण्यास येथील नगरपंचायत प्रशासनाला व लोकप्रतिनिधींना अपयश आल्याने येथील नागरिकांवर गढूळ पाणी पिण्याची वेळ आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाडा शहरात ४० हजारांहून अधिक लोकवस्ती आहे. काही नागरिकांनी येथील गढूळ पाणी व कमी दाबाने येणाऱ्या पाणीपुरवठय़ाला कंटाळून कुपनलिका (बोअरवेल) सुविधा स्वखर्चाने उभारल्या आहेत. गेल्या सात वर्षांपासून येथील नागरिकांनी पावसाळ्यात गढूळ पाणी पिण्याची वेळ येत असतानासुद्धा येथील एकही लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी बोलायला तयार नाहीत. नगरपंचायत प्रशासनावर लोकप्रतिनिधींचा वचक नसल्याने ते सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींना केराची टोपली दाखवत आहेत.

वाडा शहराचे नगरपंचायतमध्ये रूपांतर होण्याआधी २० वर्षांपूर्वी (२००१) वाडा शहराची नवीन नळपाणी योजना कार्यान्वित करण्यात आली. ही योजना कार्यान्वित करताना जलशुद्धीकरणासाठी मोठय़ा प्रमाणात खर्चही करण्यात आला.

शहरातील नागरिकांना त्यावेळी आठ ते दहा र्वष पावसाळ्यातही शुद्ध पाणी मिळाले. मात्र, त्यानंतर जलशुद्धीकरणाकडे तत्कालीन ग्रामपंचायत प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्याने जलशुद्धीकरणाचे तीन तेरा वाजले.

वाडा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभालगत असलेले जलशुद्धीकरण हे स्वयंचलित नसून ते स्टँड फिल्टर आहे. या जलशुद्धीकरणाची वाळू ही तीन वर्षांनी बदलणे अपेक्षित असते. तसेच जलशुद्धीकरणासाठी बांधण्यात आलेल्या टाक्यांची साफसफाई दरवर्षी करणे अपेक्षित असते. परंतु स्वच्छ केल्या जात नाहीतच, पण गेल्या आठ वर्षांत येथील वाळूही बदलली गेलेली नाही.

येथील नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर हा प्रश्न सुटेल अशी अपेक्षा येथील नागरिकांना होती. मात्र नगरपंचायतमधील पदाधिकारी व प्रशासनाने नागरिकांची अपेक्षा फोल ठरवली.

सध्या वाडा शहराला होत असलेला पाणीपुरवठा वैतरणा नदीतून थेट वाडा शहरातील लहानशा जागेत बांधलेल्या जलशुद्धीकरणच्या टाकीमध्ये (स्टँड फिल्टर ) होतो. परंतु या टाकीतील जलशुद्धीकरण करणारी वाळू अनेक वर्षे बदललेली नसल्याने पाणी शुद्ध होतच नाही. प्रशासनाने मात्र बघ्याची भूमिका घेतली आहे.

एक कोटी रुपयांचा निधी परत

तालुक्यात कार्यरत असलेल्या ‘कोकाकोला’ या कंपनीने येथील जलशुद्धीकरण प्रकल्प नव्याने उभारण्यासाठी सामाजिक दायीत्व निधीतून (सीएसआर) एक कोटी रुपयांचा निधी देऊ केला आहे. मात्र जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यासाठी गेल्या दोन वर्षांत नगरपंचायतीने जागा उपलब्ध करून न दिल्याने कंपनीने हा निधी देण्याचे थांबविले आहे.

काही तांत्रिक अडचणींमुळे येथील जलशुद्धीकरणाचा प्रश्न प्रलंबित राहिला आहे. पण तो लवकरच मार्गी लागेल.

– गीतांजली कोलेकर, नगराध्यक्ष, नगरपंचायत वाडा.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Muddy water palghar ssh