धोत्रे पाडय़ातील ग्रामस्थ समस्येने त्रस्त

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पालघर: तालुक्यातील गांजे-ढेकाळे गावातील धोत्रेपाडा वांद्री धरणाच्या कुशीतअसूनही पाण्यासाठी होणारी वणवण यामुळे पाडय़ातील नागरिक संताप व्यक्त करत आहेत. वांद्री धरणाच्या उजव्या कालव्यातून सिंचनासाठी दिले जाणारे पाणी बंद केल्याने विहीर कोरडी पडली आहे. त्यातच नळाला खूप कमी दाबाने पाणी येते.  त्यामुळे महिलावर्ग अडचणीत सापडल्या आहेत. रात्री बेरात्री पाणी आणण्यासाठी बाहेर पडावे लागत आहे.  माजी आमदार विलास तरे या गावचे असले तरी आमच्या समस्या पाहण्यासाठी त्यांना वेळ नाही असेही आरोप ग्रामस्थ करत आहेत. सुमारे ७० कुटुंबांची वस्ती सध्या विहिरीच्या पाण्यावर अवलंबून आहे. पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली आहे. मात्र येथे वितरण व साठवणुकीसाठी जलकुंभ नाही. शुद्ध पिण्याचे पाणी पोचवण्यासाठी घरोघरी नळ जोडणी दिली आहे. मात्र पुरेसा दाब नसल्याने पाडय़ामध्ये पाणी पोहचत नाही.  यंदा वांद्री धरणाच्या उजव्या कालव्यातून सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले नाही. पाण्याचा एकमेव स्रोत असलेली कमी खोलीची विहीर जानेवारी महिन्यातच कोरडी पडली आहे.

पिण्याच्या पाण्यासाठी विहिरीवर आईसोबत रात्र घालवावी लागते. लोकप्रतिनिधींनाही या प्रश्नाची काहीच पडलेली नाही. पाण्याअभावी हाल होत आहेत.

-राहुल धोत्रे, नागरिक, धोत्रे पाडा.

जलजीवन मिशन योजनेतून नवीन पाणीपुरवठा योजना प्रस्तावित आहे. ती कार्यान्वित झाल्यानंतर संपूर्ण ग्रामपंचायतीत पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होईल. आता पर्यायी व्यवस्था करत आहोत. 

-सतीश भागवत,  ग्रामसेवक, ढेकाळे ग्रामपंचायत.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water scarcity despite dam villagers distressed ysh