पुणे : पुण्यातील गुइलेन बॅरे सिंड्रोमचा (जीबीएस) उद्रेक आढळून आलेल्या सहा गावांमध्ये शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी जलशुद्धिकरण केंद्र बांधण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रकल्प ५०० कोटी रुपयांचा असून, राज्य सरकार आणि पुणे महापालिका हे त्यातील प्रत्येकी ५० टक्के खर्च करतील, अशी माहिती पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांच्या नियोजन समितीच्या बैठका आज पवार यांनी घेतल्या. पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सिंहगड रस्ता आणि परिसरातील पाच ते सहा गावांमध्ये झालेल्या ‘जीबीएस’ उद्रेकावर चर्चा झाली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले की, केंद्र सरकारच्या अमृत योजनेत या गावांमध्ये जलशुद्धिकरण केंद्र उभारण्यासाठीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. परंतु, तो मंजूर झाला नाही. त्यामुळे आता राज्य सरकार हा प्रकल्प उभारण्यासाठी निधी देणार आहे. हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची जबाबदारी पुणे महापालिकेसोबत राज्य सरकारचीही आहे. त्यामुळे या जीबीएसचा जास्त प्रादुर्भाव असलेल्या सहा गावांत जलशुद्धिकरण केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पाचशे कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, त्यातील २५० कोटी रुपये खर्च राज्य सरकार करेल आणि उरलेले २५० कोटी रुपये पुणे महापालिकेला खर्च करावे लागतील.

पीएमपीला एक हजार बस मिळणार

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (पीएमपीएमएल) ताफ्यातील बस जुन्या आहेत. त्यामुळे त्या बंद पडण्याचे प्रकार वाढले आहेत. पीएमपीच्या ताफ्यात एक हजार नवीन बस घेण्याचा निर्णय झाला आहे. त्यासाठी पाचशे कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. त्यात पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) २५० कोटी रुपये देणार असून, पुणे महापालिका १५० कोटी रुपये तर पिंपरी-चिंचवड महापालिका १०० कोटी रुपये खर्च देणार आहे. या सर्व ई-बस घेण्याचा विचार होता परंतु, प्रत्यक्षात या बस येण्यास खूप वेळ जातो. त्यामुळे सीएनजीवरील बस घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही पवार यांनी सांगितले.

राहुल सोलापूरकर यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रारी आल्या आहेत. त्यांनी शिवाजी महाराजांबद्दल असे विधान करायला नको होते. पोलीस तपासणी करून कारवाई करतील. – अजित पवार, पालकमंत्री

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar announcement for villages included in pmc after the outbreak of guillain barre syndrome print pune news stj 05 zws