शिरुर : लोकशाही सुदृढ होण्याबरोबरच प्रत्येकाचे अर्थकारण सबळ झाले पाहिजे, या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सामाजिक कार्यकर्ते व कृषिलोक विकास संस्थेचे अध्यक्ष माजी नगरसेवक रवींद्र धनक म्हणाले. राज्याचे पहिले मुख्यमंत्री व माजी उपपंतप्रधान स्वर्गिय यशवंतराव चव्हाण यांच्या ११२ व्या जयंती निमित्त स्वर्गिय यशवंतराव चव्हाण सामाजिक शैक्षणिक प्रतिष्ठानच्या वतीने स्व. यशवंतराव चव्हाण चौक येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी मान्यवरांच्या हस्ते चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याप्रसंगी बोलताना धनक म्हणाले की, लोकशाही व्यवस्था चालविण्यासाठी आपण सर्वांचा सहभाग महत्वाचा आहे. आपण या देशाचे मालक आहोत याची जाणीव सर्वांनी ठेवावी. त्याचबरोबर चुकीचा गोष्टीला चूक म्हणणेही आवश्यक आहे. स्वर्गिय यशवंतराव चव्हाण यांनी साहित्य, राजकारण, शैक्षणिक क्षेत्रात दीपस्तंभासारखे काम केले. यशवंतराव चव्हाण यांना आधिक काळ जीवन मिळायला हवे होते.

प्रा चंद्रकांत धापटे यांनी सांगितले की, यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राची जडणघडण केली. सर्वांना बरोबर घेवून जाण्याचे काम चव्हाण यांनी केले. यशवंतराव चव्हाण यांचे विचार जनसामान्यापर्यंत पोहोचविण्याचे काम करावे.

माजी मुख्याध्यापक इंद्रजीत कळमकर म्हणाले की यशवंतराव चव्हाण हे राजकारण्या बरोबरच उत्तम साहित्यीक होते . शेतक -यांविषयी त्यांना कणव होती.

आझाद हिंद गणेश मंडळाचे शंकरसिंग परदेशी म्हणाले की यशवंतराव चव्हाण भूमिगत असताना शिरुर शहरात काही काळासाठी वास्तव्यास होते व आपण त्यांना पाहिल असल्याचे त्यांनी सांगितल.

मावळाई प्रकाशनचे डॉ . सुभाष गवारी, व्यवसायिक विशाल कळमकर, पालिकेचे स्वच्छता आधिकारी दत्तात्रेय बर्गे, भाजपाचे नीलेश गवळी आदीची यावेळी भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय बारवकर यांनी केले. त्यांनी सांगितले की स्वातंत्र्यपूर्व काळात सन १९४२ च्या दरम्यान भूमिगत असताना स्व. यशवंतराव चव्हाण यांचे शिरुर येथील डंबेनाला परिसरात काही काळ वास्तव्य होते. त्यांच्या वास्तव्याच्या इतिहासाचा वारसा जोपासण्यासाठी त्यांच्या जयंतीदिनी सन १२ मार्च १९९९ रोजी डंबेनाला परिसरातील नागरिकांनी एकत्र येत त्यांच्या नावे चौकाची स्थापना केली. गांधीवादी विचारवंत स्व. बाळासाहेब भारदे, ज्येष्ठ पत्रकार स्व. वरुणराज भिडे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला होता. प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्षेत्रांतील गुणवंतांचे सत्कार, शैक्षणिक साहित्य वाटप, अनाथांसोबत दिवाळी असे अनेक विधायक उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतात. स्वागत बाळासाहेब झाडगे यांनी तर सूत्रसंचालन राजू शेजवळ यांनी केले. आभार माधव मुंडे यांनी मानले. याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, माजी नगरसेवक मंगेश खांडरे माजी सभापती ॲड. प्रदीप बारवकर, प्रसिध्द व्यवसायिक ललित खाबिया, मुद्रक संघटनेचे अध्यक्ष बाबूराव पाचंगे, संतोष गवळी, डॉ. राजेश खांडरे, सुधाकर ओतारी, मनोज ओतारी, आदी उपस्थित होते.

चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्रावर महाराष्ट्र प्राचार्य फोरमचे माजी अध्यक्ष नंदकुमार निकम यांच्या हस्ते माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना निकम म्हणाले की आधुनिक भारताच्या जडणघडणीत यशवंतराव चव्हाण यांचे मौल्याचे योगदान राहिले आहे. साहित्य, समाजकारण, राजकारण यात त्यांना उत्तम गती होती. त्याचे नेतृत्व निस्पृह असे होते. त्यांनी मुख्यमंत्री, उपपंतप्रधान, केंद्रीय मंत्री अश्या विविध जबाबदारी सांभाळत आपल्या कर्तृत्वाचा ठसा तेथे उमटविला. त्यांची प्रतिमा स्वच्छ होती व राजकारणातील सुसंस्कृत नेते ते होते. कृषी, औद्योगिक विकासासाठी त्यांनी आग्रह धरला असे निकम म्हणाले. त्याच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी आपण एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत, असेही ते म्हणाले.

केंद्रप्रमुख तथा प्राचार्य डॉ . के . सी . मोहिते म्हणाले की ग्रामीण विकासाच्या विविध योजना यशवंतराव चव्हाण यांनी राबविल्या. ते सुसंस्कृत राजकारणी व साहित्यिक होते. विविध स्तरावर काम करणारा कार्यकर्त्याचे मोहोळ त्यांनी निर्माण केले. समाजातील वंचित दुर्बल घटकांसाठी काम केले. सर्वसामान्यापर्यंत शिक्षण पोहोचले पाहिजे अशी त्यांची तळमळ होती. त्याच्या रुपाने खंबीर व सयंमी नेतृत्व देशाला लाभल्याचे मोहिते म्हणाले. यावेळी उपप्राचार्य हरिदास जाधव, प्रसाद हिंदूराव शिंदे, के. बी. काळे, केंद्र सहाय्यक निळोबा भोगावडे, बाळासाहेब जाधव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्र संयोजक डॉ. अंबादास केत यांनी केले सूत्रसंचालन प्रा. सतीश धुमाळ यांनी केले. आभार केंद्र सल्लागार प्रा. चंद्रकांत धापटे यांनी मानले .

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Along with strengthening democracy it is necessary to strengthen everyone economy ravindra dhanak president of krishilok vikas sanstha pune print news ssb