पुणे : मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा आणि पदोन्नतीद्वारे केंद्रप्रमुख पदाच्या निवडीसाठीच्या व्यावसायिक आणि शैक्षणिक पात्रतेमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे निवडीसाठी कला, वाणिज्य, विज्ञान शाखेतील पदवी आणि जिल्हा परिषद शाळेत प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर सहा वर्षे अखंडित नियमित सेवा,  तर पदोन्नतीने निवडीसाठी प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर सहा वर्षे अखंडित नियमित सेवा पूर्ण केलेल्या उमेदवारांतून सेवाज्येष्ठता आणि गुणवत्तेच्या आधारे निवड करण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पुणे: म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्याला २० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

राज्यातील शाळांमध्ये केंद्रप्रमुखांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा आणि पदोन्नतीद्वारे केंद्रप्रमुख निवडीचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. त्यानुसार पात्रता निश्चित करून प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र केंद्रप्रमुख पदाच्या पात्रतेबाबत आक्षेप घेऊन न्यायालयात याचिका दाखल होऊ लागल्या. त्यात प्रामुख्याने मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी पदवीला किमान ५० टक्के गुण अनिवार्य, किमान ५० वर्षे वयाची अट रद्द करण्याची मागणी करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर, केंद्रप्रमुख पदाच्या पात्रतेतील सुधारणांबाबतचा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाने प्रसिद्ध केला. शासन निर्णयानुसार डिसेंबर २०२२च्या शासन निर्णयातील मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी पदवीला किमान ५० टक्के गुण, कमाल वयोमर्यादा ५० वर्षे, शिक्षण सेवक कालावधी वगळून जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक ) या पदावर किमान तीन वर्षे नियमित अखंड सेवा पूर्ण केलेल्या उमेदवारांतून सेवाज्येष्ठता आणि गुणवत्तेच्या आधारे पदोन्नतीने नेमणूक या तरतुदी वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. तर उर्वरित तरतुदी लागू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.  केंद्रप्रमुख हे पद जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील असल्याने सेवाप्रवेश नियमांमध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्याची कार्यवाही ग्रामविकास विभागाने करावी, असे स्पष्ट करण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Change in minimum qualification of centre heads in maharashtra schools pune print news ccp 14 zws 70 ccp14