स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पोलीस दलातील उल्लेखनीय सेवेबद्दल देण्यात येणारे राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर करण्यात आले. यामध्ये पुणे पोलिसांच्या मोटार परिवहन विभागातील सहायक फौजदार दामोदर मोहिते, पोलीस हवालदार नामदेव रेणुसे, बिनतारी संदेश विभागातील (वायरलेस) पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब सुंबे, राज्य गुन्हे अन्वेषण विभागातील (सीआयडी) पोलीस हवालदार संगीता सावरतकर-शिंत्रे आणि कारागृह विभागातील सुभेदार शेषराव थोरात यांचा समावेश आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पोलीस दलात उल्लेखनीय आणि प्रशंसनीय कामगिरी करणाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर करण्यात येते. यंदाच्या वर्षी पुणे पोलीस दलातून फक्त दोन पोलिसांची राष्ट्रपती पदकासाठी शिफारश करण्यात आली होती. यामध्ये मोटार परिवहन विभागातील सहायक फौजदार मोहिते व रेणुसे यांचा समावेश होता, तर राज्य गुन्हे अन्वेषण विभागातून हवालदार सावरतकर-शिंत्रे, कारागृह विभागातून सुभेदार थोरात यांची शिफारस करण्यात आली होती.
मोहिते सन १९८१ मध्ये दौंड येथील राज्य राखीव पोलीस दलात रुजू झाले. त्यांनी नक्षलग्रस्त भागात तसेच हैद्राबाद, भिवंडी, आसाम, पंजाब येथे सेवा बजाविली. त्यानंतर त्यांची बदली सन २००७ मध्ये पुणे पोलीस दलात झाली. सेवा कालावधीत त्यांनी बजाविलेल्या कामगिरीबद्दल २२९ बक्षिसे मिळाली आहेत. बिनतारी संदेश विभागात सुंबे सन १९८४ मध्ये रुजू झाले. त्यांनी सोलापूर, ठाणे ग्रामीण, भिवंडी, मुंबई, सातारा व पुणे शहर येथे सेवा बजाविली आहे. आतापर्यंत १२१ बक्षिसे मिळाली असून गेल्या वर्षी त्यांना पोलीस महासंचालाकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले होते. हवालदार रेणुसे सध्या पुणे पोलिसांच्या विशेष शाखेत नेमणुकीस आहेत. पोलीस मुख्यालय, लष्कर पोलीस ठाणे, गुन्हे शाखेत ते नेमणुकीस होते. सेवा कालावधीत त्यांना २५६ बक्षिसे मिळाली आहेत.
सीआयडीतील हवालदार सावरतकर-शिंत्रे मूळच्या कोल्हापूर जिल्ह्य़ातील आहेत. सन १९९१ मध्ये त्या पुणे पोलीस दलात भरती झाल्या. त्या गुन्हे शाखा, फरासखाना पोलीस ठाणे, विशेष शाखा, लाचलुचपत प्रतिबंधक विभागात नेमणुकीस होत्या. आतापर्यंत त्यांना ३०२ बक्षिसे मिळाली आहेत. त्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह मिळाले आहे, तर कारागृह विभागातील सुभेदार थोरात सध्या परभणी कारागृहात नेमणुकीस आहेत. थोरात यांना उल्लेखनीय सेवेबद्दल सुधार सेवापदक जाहीर करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five pune city cops selected for president medal