पिंपरी : पुणे महामेट्रोच्या वतीने पिंपरी ते निगडी या विस्तारित मार्गाचे काम सुरू आहे. या कामास अडथळा ठरणाऱ्या ५७ झाडांवर कुऱ्हाड चालविली जाणार आहे. त्यामुळे वृक्षप्रेमींनी नाराजी व्यक्त केली. पिंपरी ते निगडी या मार्गावर ४.४१ किलोमीटर अंतराची मेट्रोची मार्गिका तयार केली जाणार आहे. त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. कामास अडथळा ठरत असल्याने पंधरा वर्षे जुनी झाडे तोडण्यात येत आहेत. मेट्रोच्या ‘व्हायाडक्ट’चे काम रेल विकास निगमकडून केले जात आहे. निगडी येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पीएमपीएमएल बस आगाराजवळ खांब (पिलर) उभारण्यात येत असून, अडथळा ठरणारी झाडे तोडली जात आहेत. निगडीतील वर्तुळाकार उड्डाण पुलाजवळील श्रीकृष्ण मंदिरालगतच्या पदपथावरील झाडे तोडण्यास सुरुवात करण्यात आली. तेथील नऊ झाडे तोडण्यात आली आहेत. निगडी ते पिंपरीपर्यंतच्या पदपथावरील झाडे तोडली जात असल्याने वृक्षप्रेमींनी नाराजी व्यक्त करीत वृक्षतोडीस विरोध केला. या संदर्भात महापालिकेकडे तक्रार करण्यात आली आहे. हे ही वाचा. पिंपरी : अपार जिद्दीच्या जोरावर ‘प्रगती’चा मार्ग सुकर; वाचा ‘एमपीएससी’तील दुहेरी यशाची कहाणी ५७ झाडांवर कुऱ्हाड टबोबियाची १८, पेल्टाफोरमची, फिस्टेलमापची प्रत्येकी नऊ, कडुनिंब, वड, अशोकाची दोन, पिंपळाची पाच, उंबराची चार, फायकस, रेन ट्री ए, अशोक, स्पॅथोडिया, जांभूळ, फणसाचे प्रत्येकी एक अशी एकूण ५७ झाडे तोडली जाणार आहेत. त्यातील ५० झाडे महापालिकेची असून, सात झाडे श्रीकृष्ण मंदिर ट्रस्टच्या मालकीची आहेत. मेट्रोच्या मार्गिकेस अडथळा ठरणारी झाडे हटविण्यात येत आहेत. त्याला महापालिकेने परवानगी दिली आहे. एका झाडाच्या बदल्यात दहा झाडे लावली जाणार आहेत. जगतील अशा झाडांचे पुनर्रोपण केले जाईल, असे महामेट्रोचे संचालक डॉ. हेमंत सोनवणे यांनी सांगितले. तर, कामास अडथळा ठरणारी झाडे हटविण्याबाबत महामेट्रोने महापालिकेकडे अर्ज केला होता. त्यानुसार परवानगी दिली आहे. जगणाऱ्या झाडांचे पुनर्रोपण करणे आणि एका झाडाच्या बदल्यात दहा झाडे कासारवाडी येथील मैलाशुद्धीकरण केंद्रात लावावीत. त्यांची तीन वर्षे देखभाल करावी, अशी अट ठेवली असल्याचे उद्यान विभागाचे उपायुक्त रविकिरण घोडके म्हणाले. हे ही वाचा. पोर्शे अपघात प्रकरणातील खटले जलदगती न्यायालयात चालवावेत, पोलीस आयुक्तांची न्यायालयाकडे मागणी गुन्हा दाखल करण्याची मागणी महापालिका एकीकडे वृक्षारोपण करीत आहे, तर महामेट्रो ती झाडे तोडत आहे. मेट्रो मार्गिकेचा ठेकेदार हे काम करीत नसून, त्याने नेमलेल्या उपठेकेदाराकडून वृक्षतोड केली जात आहे. संबंधित ठेकेदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अविनाश वाघमारे यांनी केली.