पुणे : जमिनीच्या वादातून नातेवाईक तरुणावर दोघांनी तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून केल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरात घडली. याप्रकरणी दोघांविरूद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला असून, खून झालेल्या तरुणाच्या नातेवाईकांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात आंदोलन केले. नातेवाईकांनी आरोपींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली. आदित्य उर्फ राजू जनार्दन पोकळे (वय १९, रा. खंडोबाचा मळा, रायकर मळा, धायरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी संपत तानाजी काळोखे, सागर पोपट रायकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी काळोखे, रायकर पसार झाले असून, त्यांना पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य आणि आरोपी नातेवाईक आहेत. त्यांच्यात जमिनीवरून गेल्या काही वर्षांपासून वाद सुरु आहेत. मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता सुमारास आदित्य कामगारांसह जागेवर पत्र्याच्या शेडचे काम करत होता. त्यावेळी काळोखे आणि रायकर तेथे आले. आदित्य आणि आरोपींमध्ये वाद झाला. त्यानंतर आरोपींनी आदित्यवर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. गंभीर जखमी झालेल्या आदित्यला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनी घटनास्थळी भेट दिली.

हेही वाचा : सुनील तटकरे स्पष्टच बोलले, “सुनेत्रा पवारच बारामतीमधून राष्ट्रवादीच्या उमेदवार”

धायरीत तणाव

आदित्यच्या खुनानंतर धायरीतील रायकर मळा परिसरात तणाव निर्माण झाला. आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र, पोलीस आरोपींना हजर करत नाहीत, असा आरोप करून नातेवाईकांनी पोलीस ठाण्याच्या आवारात आंदोलन केले. नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी आंदाेलन मागे घेतले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune at dhayari youth killed by his relatives due to land dispute pune print news rbk 25 css