पिंपरी : उद्योगनगरीत विविध उपक्रमांनी स्वातंत्र्यदिन साजरा, भर पावसातही शहरवासियांच्या उत्साहाला उधाण

करोना काळात विधवा झालेल्या महिलेच्या हस्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पिंपरीतील मध्यवर्ती कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले.

पिंपरी : उद्योगनगरीत विविध उपक्रमांनी स्वातंत्र्यदिन साजरा, भर पावसातही शहरवासियांच्या उत्साहाला उधाण
पिंपरी : उद्योगनगरीत विविध उपक्रमांनी स्वातंत्र्यदिन साजरा, भर पावसातही शहरवासियांच्या उत्साहाला उधाण

पिंपरी : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात विविध संस्था, संघटना, व्यक्ती, राजकीय पक्ष आदींच्या वतीने सोमवारी (१५ ऑगस्ट) विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्रभात फेरी, रक्तदान शिबीर, मानवी साखळी, गुणवंतांचा सत्कार, मेट्रो सहल, सांस्कृतिक कार्यक्रमांनी उद्योगनगरी अक्षरश: ढवळून निघाल्याचे चित्र दिसून आले. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. तरीही शहरवासियांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण होते.

महापालिकेचे प्रशासक राजेश पाटील यांच्या हस्ते पालिका मुख्यालयात तर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या हस्ते पोलीस आयुक्तालयात ध्वजारोहण करण्यात आले. पालिका भवनात अग्निशामक दल तसेच तृतीयपंथी ग्रीन मार्शल, रिव्हर मार्शल आणि सुरक्षा दलाच्या वतीने सलामी देण्यात आली. अग्निशामक दलाने पाण्याच्या तुषारांद्वारे भारतीय तिरंग्याची प्रतिकृती सादर करून उपस्थितांची मने जिंकली. औद्योगिक प्रशिक्षण केंद्रासह विविध शैक्षणिक संस्थांच्या विद्यार्थ्यांनी ‘भारत माता की जय, वंदे मातरम’ असा नारा देत प्रभातफेरी काढली. पालिकेच्या अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांनी मिळून सुमारे २०० जणांनी रक्तदान केले. निगडी भक्ती शक्ती उद्यानात देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम पार पडला. प्राधिकरणातील मदनलाल धिंग्रा मैदानावर शालेय विद्यार्थ्यांनी मानवी साखळीच्या माध्यमातून राष्ट्रध्वजासह विविध प्रतिकृतींचे सादरीकरण केले. भोसरीत तिरंगा फेरीचे आयोजन करण्यात आले होते. माजी नगरसेवक नितीन लांडगे, संतोष लोंढे, सोनाली गव्हाणे, भीमाताई फुगे यांनी संयुक्त विद्यमाने ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम राबवण्यात आली. महात्मा फुले विद्यालयातील १२०० विद्यार्थ्यांसह विश्वस्त, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व भोसरी परिसरातील नागरिकांनी या फेरीत उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. या फेरीत विद्यार्थी, शिक्षक आदी सहभागी होते. या मार्गातील पालक, तसेच नागरिकांनी तिरंगा रॅलीचे स्वागत केले. शालेय विद्यार्थ्यांची मेट्रो सहल घडवून आणण्यात आली. सायंकाळी बहुतांश भागात मिरवणुका काढण्यात आल्या.

विधवेच्या हस्ते ध्वजारोहण

करोना काळात विधवा झालेल्या महिलेच्या हस्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पिंपरीतील मध्यवर्ती कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष सचिन चिखले, कर्मचारी सेनेचे अध्यक्ष रूपेश पटेकर, राजू सावळे, विशाल मानकरी, बाळा दानवले, मयूर चिंचवडे,अश्विनी बांगर ,सीमा बेलापूरकर ,अनिता पांचाळ आदी उपस्थित होते. यासंदर्भात रूपेश पटेकर यांनी सांगितले की, करोना काळात विधवा झालेल्या महिलांची परिस्थिती अतिशय बिकट आहे. कोणत्याही महिलेचे मानवी हक्क नाकारले जावू नये, त्यांना समाजात मानाचे स्थान मिळावे, यासाठी त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पुणे : शहरात वेगवेगळ्या भागात घरफोडी, सहा लाखांचा ऐवज लांबविला
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी