पुणे : वैमनस्यातून टोळक्याने तरुणावर तलवारीने वार करुन खून केल्याची घटना कोथरूड भागातील शास्त्रीनगर परिसरात रविवारी मध्यरात्री घडली. टोळक्याने तरुणावर पिस्तुलातून गोळीबार केला. याप्रकरणी आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोथरुड भागात बुधवारी संगणक अभियंता तरुणाला गज्या मारणे टोळीतील गुंडांनी मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच शास्त्रीनगर परिसरात झालेल्या खुनाच्या घटनेमुळे परिसरात घबराट उडाली आहे.
गौरव अविनाश थोरात (वय २२, रा. मराठा महासंघ सोसायटी, शास्त्रीनगर, पौड रस्ता कोथरूड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी दिनेश भालेराव (वय २७), सोहेल सय्यद (वय २४), राकेश सावंत (वय २४), साहिल वाकडे (वय २५), बंड्या नागटिळक (वय १८), लखन शिरोळे (वय २७), अनिकेत उमाप (वय २२) यांच्यासह आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींमध्ये एका अल्पवयीनाचा समावेश आहे. सागर वसंत कसबे (वय ४७) यांनी काेथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव आणि आरोपी सोहेल यांच्यात वाद झाले होते.. गौरव याने आराेपीच्या पत्नीबरोबर वाद घातला होता. दोन दिवसांपूर्वी गौरव आणि सोहेल यांच्यात पुन्हा वाद झाला होता. रविवारी मध्यरात्री गौरव हा शास्त्रीनगर येथील दत्त मंदिराजवळ मित्रांसोबत बसला होता. त्या वेळी सोहेल सय्यद हा साथीदारांसह तिथे आला. सोहेलने त्याच्याकडील देशी बनावटीच्या पिस्तुलातून गौरवच्या दिशेने गोळी झाडली. गौरवला गोळी लागली नाही. त्यानंतर आरोपींनी तलवार आणि कोयत्याने गौरव याच्यावर हल्ला केला. आरोपींनी त्याच्यावर वार केले. गंभीर जखमी झालेल्या गौरवला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच तो मरण पावला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसंनी घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.
© The Indian Express (P) Ltd