अनैतिक संबंधांत अडथळा ठरल्याने दीड वर्षांच्या बालकाचा गळा दाबून खून करणाऱ्या एकाला अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी जन्मठेप आणि एक लाख २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धिराप्पा ऊर्फ चक्राप्पा शंकराप्पा हात्तरखिल्लळ (वय २४, रा. रांजणगाव, शिरूर, मूळ रा. कर्नाटक) असे शिक्षा सुनावलेल्याचे नाव आहे. याबाबत मुलाचे वडील मल्लप्पा कुमाराच्या हात्तरखिल्लळ यांनी फिर्याद दिली होती. धिराप्पा याचे फिर्यादी यांच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. त्याने ३१ मार्च २०१४ रोजी फिर्यादी यांचा दीड वर्षीय मुलगा गंगाधरचा शिरूरमध्ये खून केला होता. या प्रकरणात धिराप्पाविरोधात सुरवातीला कर्नाटकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर संबंधित गुन्हा शिरूर पोलिसांकडे तपासासाठी सोपविण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक एन. वाय. तडाखे यांनी केला. खटल्यात सरकारपक्षाकडून सरकारी वकील नामदेव तरळगट्टी यांनी बाजू मांडली. सहायक पोलीस फौजदार विद्याधर निचीत आणि पोलीस हवालदार रेणुका भिसे यांनी न्यायालयीन कामकाजात सहाय केले. दंडाच्या रकमेतील एक लाख रुपये फिर्यादी मल्लपा हात्तरखिल्लळ यांना देण्यात यावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा – पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उपाययोजना; महापालिका, मेट्रो, वाहतूक पोलिसांकडून पाहणी

हेही वाचा – पुणे: कायदेशीर प्रक्रियेचे पालन न करता बालभारती-पौड फाटा रस्त्याचा घाट

आईसमोर मुलाचा खून

घटनेच्या दिवशी धिराप्पा फिर्यादी यांच्या घरी आला. गंगाधर त्यांचा अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने त्याने चिडून मुलाचा गळा पकडला. त्याला रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या आईला त्याने मारहाण केली. त्याने दीड वर्षांच्या गंगाधरचा गळा दाबून खून केला. त्यानंतर या घटनेची माहिती कोणाला दिल्यास जिवे मारू, अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने पुरावा नष्ट करण्यासाठी मृतावस्थेतील गंगाधर आणि त्याच्या आईला कर्नाटकला नेले. तेथून धिराप्पा पसार झाला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Life imprisonment for the accused who killed a child due to immoral relationship pune print news rbk 25 ssb