पुणे : जगभरातील कोट्यवधी नागरिकांना करोना विषाणूपासून सुरक्षित ठेवणाऱ्या ‘कोव्हिशील्ड’ लसीचे निर्माते आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांना लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकमान्यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून दरवर्षी १ ऑगस्ट रोजी हा पुरस्कार प्रदान केला जातो. मात्र, यंदा १३ ऑगस्ट रोजी टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये सकाळी साडेदहा वाजता मोजक्या लोकांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमात पूनावाला यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. महापौर मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे या वेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांनी शुक्रवारी दिली.

गेल्या वर्षीचा पुरस्कार काही कालावधीनंतर

शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचूक यांना गेल्या वर्षीचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. मात्र, करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे हा पुरस्कार प्रदान करता आला नाही. ऑनलाइन माध्यमातून पुरस्कार प्रदान करण्याची तयारी होती. मात्र, पुण्यात येऊनच हा पुरस्कार स्वीकारण्याची इच्छा वांगचूक यांनी प्रदर्शित केल्यामुळे हा पुरस्कार काही कालावधीनंतर प्रदान करण्यात येणार असल्याचे डॉ. दीपक टिळक यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lokmanya tilak national award announced to cyrus poonawala akp