पुणे : अहिल्यानगरमध्ये रविवारी महाराष्ट्र केसरी स्पर्धेची उपांत्य आणि अंतिम फेरी पार पडली. त्या स्पर्धेत पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ हा यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा मानकरी ठरला. पैलवान पृथ्वीराज मोहोळने स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पैलवान महेंद्र गायकवाडवर मात करत महाराष्ट्र केसरी स्पर्धेची गदा पटकावली. मात्र या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पंचांबरोबर वाद घातल्यामुळे कुस्तीगीर परिषदेने महेंद्र गायकवाडवर तीन वर्षांसाठी निलंबनाची कारवाई केली आहे. तर उपांत्य फेरीतही असाच वाद पाहायला मिळाला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उपांत्य फेरीत मोहोळ विरुद्ध पैलवान शिवराज राक्षे यांच्यात सामना झाला होता. या सामन्यात ४० सेकंदात पंचांनी पृथ्वीराज मोहोळला विजयी घोषित केलं. पंचांनी चुकीच्या पद्धतीने निकाल दिल्याचा आरोप करत शिवराज राक्षे यांनी पंचांशी वाद घातला. तर शिवराजने एका पंचाला लाथ देखील घातली. त्यामुळे कुस्तीगीर परिषदेने शिवराज राक्षे याला तीन वर्षांसाठी निलंबित केलं आहे. या घटनेनंतर कुस्ती क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जिंकल्यानंतर पृथ्वीराज मोहोळ पुण्यात येताच, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेत आरती देखील केली. त्यानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधी सोबत संवाद साधताना, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेदरम्यान शिवराज राक्षे याने पंचांसोबत वाद घालून लाथ देखील मारल्याची घटना घडली. त्या स्पर्धेदरम्यान नेमकं काय घडलं होतं, त्या प्रश्नावर पृथ्वीराज मोहोळ म्हणाला, मी जी मूव्हीमेंट केली होती. त्यावेळी माझ कोणाकडे लक्ष नव्हतं आणि माझ्याकडून ती मूव्हीमेंट झाली होती. त्यावर पंचांनी मला विजयी घोषित केले. होय शिवराज राक्षेची एका बाजूची पाठ नक्की टेकली होती. हे दुसर्‍या बाजूच्या व्हिडिओने दिसत आहे. त्यानंतर शिवराज राक्षे यांच्याकडून पंचांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. ही गोष्ट पैलवान क्षेत्राच्या दृष्टीने चुकीची बाब असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

तसेच ते पुढे म्हणाले, प्रत्येक पैलवानचं एक स्वप्न असतं, ते म्हणजे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जिंकणं माझं हे स्वप्न पूर्ण झाले असून यामध्ये माझ्या कुटुंबियांनी वेळोवेळी केलेलं मार्गदर्शन हे महत्वाचं ठरलं आहे. यामुळे ही स्पर्धा मी जिंकू शकलो असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra kesari wrestling tournament winner prithviraj mohol reaction on shivraj rakshe svk 88 mrj