मसापच्या विशेष ग्रंथकार पुरस्काराचे वितरण 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

असहिष्णूतेच्या आगीत होरपळून आपण देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. ती आग शांत करणे अजूनही आपल्याला जमले नाही. देशाला जळताना पाहून लेखकाला मौन धारण करणे कसे शक्य आहे, असा सवाल ज्येष्ठ कन्नड लेखिका वैदेही यांनी शुक्रवारी उपस्थित केला. मौनावर आणि बोलण्यावर अपार श्रद्धा असलेला असा आपला देश आहे. पण, बोलणं आणि मौन दोन्हीही मरतंय. हा लोकशाहीतील दुष्काळ आहे का? बोलणे आणि मौन यामध्ये हरपलेल्या काळात लेखकच शब्दांना अर्थ प्राप्त करून देतील, अशा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या १११ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात वैदेही यांच्या हस्ते विशेष ग्रंथकार पुरस्कार आणि वार्षिक ग्रंथ पारितोषिके प्रदान करण्यात आली. परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे, विश्वस्त उल्हास पवार, उपाध्यक्ष चंद्रकांत शेवाळे, कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोशाध्यक्ष सुनीताराजे पवार या वेळी व्यासपीठावर होत्या. ललित साहित्य, काव्य, रंगभूमी, चित्रपट या माध्यमांतून मराठी आणि कन्नड या भाषांमध्ये असलेला सांस्कृतिक अनुबंध राजकारणी संपुष्टात आणू शकत नाहीत, असे सांगू वैदेही म्हणाल्या, मराठी भाषकांच्या साहित्यप्रेमाविषयी डॉ. यू. आर. अनंतमूर्ती यांच्याकडून जे ऐकले होते त्याची प्रचिती आज घेत आहे. मराठी मातृभाषा असलेले द. रा. बेंद्रे यांनी साहित्यातून जीवनावरचे भाष्य केले आहे. डॉ. के. शिवराम कारंथ यांच्या पत्नी लीला कारंथ यांनी हरि नारायण आपटे यांची ‘पण लक्षात कोण घेतो’ ही कादंबरी कन्नडमध्ये आणून अनुवादाची प्रक्रिया सुरू केली. सानिया, मेघना पेठे, कविता महाजन यांच्या लेखनासह दलित साहित्य कन्नडमध्ये अनुवादित झाले आहे. ‘एकच प्याला’, ‘शांतता कोर्ट सुरू आहे’, ‘वाडा चिरेबंदी’ ही नाटके तर मूळ कन्नडमध्येच आहेत असे वाटते.  लेखन हा अभिव्यक्तीचा आवाज आहे. मी लेखन करते, तेव्हा स्त्री-पुरुष या लिंगभेदापेक्षाही लेखक असते. महिलांनी लेखनासाठी वेळ काढणं हेच आव्हान असते असे सांगून वैदेही म्हणाल्या, इंग्रजी माध्यमाला चांगल्या संधी प्राप्त झाल्याने सध्या प्रादेशिक भाषांची अवस्था फारशी चांगली नाही. मातृभाषा नाकारतो म्हणजे आपण आपला सांस्कृतिक वारसा नाकारतो. भाषा म्हणजे अक्षर किंवा शब्द नाहीत. तर, भाषा ही अभिव्यक्तीची संवेदना असते.  सर्जनशील आणि वैचारिक साहित्य निर्मिती होत आहे, तोपर्यंत मराठी भाषेला मरण नाही, अशी भावना डॉ. रावसाहेब कसबे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली. जोशी यांनी प्रास्ताविक केले. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra sahitya parishad kannada writer vaidehi