राष्ट्रवादी आणि भाजपच्या विचित्र कचाटय़ात अडकलेल्या िपपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे यांनी विविध कसरती करत महापौरपदाचे वर्ष पूर्ण केले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या राजकारणात महापौरांचे पुरते ‘सँडविच’ झाले असून पक्षनिष्ठा की व्यक्तिनिष्ठा, यापैकी एकाची निवड करत महापौरांना पुढील राजकीय वाटचाल करावी लागणार आहे.
िपपरीत महापौरपदासाठी अनुसूचित जमातीचे आरक्षण असून शकुंतला धराडे त्या पदावर आहेत. त्यांच्या महापौरपदाला एक वर्षे पूर्ण झाले. सामान्य कुटुंबातून आलेल्या धराडे वर्षांपूर्वी महापौर झाल्या. हलाखीच्या परिस्थितीमुळे शेतमजुरीसह मिळेल ते काम करून त्यांनी इथपर्यंत प्रवास केला. बचत गटातून काम करत त्या राजकारणात आल्या आणि अवघ्या सात वर्षांत या मानाच्या पदावर विराजमान झाल्या. त्या पक्षप्रमुख शरद पवार, अजितदादा व जगताप यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतात.
िपपळे गुरवमधून जगतापांच्या कृपादृष्टीमुळे त्या दोन वेळा निवडून आल्या. त्यांना महापौर अजितदादांनी केले, त्यासाठी जगतापांनी वजन खर्ची घातले. धराडे महापौर झाल्यानंतर काही कालावधीतच जगताप भाजपमध्ये गेले व महापौरांची राजकीय फरफट सुरू झाली. राष्ट्रवादीतील जगताप समर्थक भाजपमध्ये आले. मात्र, महापौर राष्ट्रवादीतच राहिल्या. भाजप-राष्ट्रवादीच्या तिढय़ामुळे त्यांच्यापुढे अनेक अडचणी उभ्या राहिल्या. जगताप समर्थक असल्याने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी महापौरांना अपेक्षित सन्मान दिला नाही, विश्वासात घेतले नाही. प्रतिकूल परिस्थितीत वेगवेगळ्या अडचणी आणि त्रासातून मार्ग काढत महापौरांनी आपले वर्षे पूर्ण केले. आता पुढील महापौरपदाची चर्चा सुरू झाल्याने धराडेंच्या निर्णयाची घडी आलेली आहे. व्यक्तिनिष्ठा ठेवून त्यांना भाजपमध्ये जावे लागेल अथवा पक्षनिष्ठेसाठी अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करावे लागेल. दोन्हीकडून त्यांची अडचण आहे. जगतापांच्या विरोधात त्यांच्याच गावात त्या काहीही करू शकत नाहीत. दुसरीकडे, गॉडफादर नसताना भाजपमध्ये जाऊन उपयोग नाही, हेही उघड आहे.
संग्रहित लेख, दिनांक 9th Sep 2015 रोजी प्रकाशित
पक्षनिष्ठा की व्यक्तिनिष्ठा; निर्णयाची घडी!
भाजप-राष्ट्रवादीच्या तिढय़ामुळे त्यांच्यापुढे अनेक अडचणी उभ्या राहिल्या

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 09-09-2015 at 03:10 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mayor ncp bjp pcmc