नाटय़क्षेत्रातून नाराजीचा सूर
वेगवेगळ्या कारणांमुळे सातत्याने चर्चेत राहिलेल्या पिंपरी पालिकेच्या नवी सांगवी येथील निळूभाऊ फुले नाटय़गृहासाठी नवीन भाडेदर निश्चित करण्यात आले आहेत. फुले नाटय़गृहासाठी भोसरीतील अंकुशराव लांडगे नाटय़गृहातील दर डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहेत. भोसरीच्या तुलनेत सांगवीतील दर ५० टक्के जास्त आहेत. त्यामुळे नाटय़क्षेत्रातून तीव्र नाराजीचा सूर व्यक्त होऊ लागला आहे.
सांगवीतील फुले नाटय़गृहाचे चार महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वाजतगाजत उद्घाटन करण्यात आले. प्रत्यक्षात मात्र अजूनही नाटय़गृह सुरू होऊ शकलेले नाही. नियोजनाचा अभाव हे मुख्य कारण असले, तरी नाटय़गृहातील अद्ययावत ध्वनिक्षेपक यंत्रणा सुरू नाही, हे सातत्याने दिले जाणारे कारण आहे. आता सांगवीतील नाटय़गृह सुरू करण्यासाठी पालिका यंत्रणा कामाला लागली आहे. नाटय़गृहातील भाडेदर काय असावेत, याचा तक्ता तयार करण्यात आला आहे. स्थायी समितीच्या बैठकीत आयत्या वेळेस प्रस्ताव मांडून त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
भोसरीतील अंकुशराव लांडगे नाटय़गृहासाठी आकारण्यात येणारे दर डोळ्यासमोर ठेवून त्यापेक्षा ५० टक्के अधिक दर सांगवीतील फुले नाटय़गृहासाठी निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार, लांडगे नाटय़गृहात नाटय़प्रयोगासाठी ३३०० रुपये, परिसंवाद व चर्चासत्रासाठी ६८०० रुपये तर ऑक्रेस्ट्रॉसाठी ११ हजार ३०० रुपये दर आहेत. त्याचपद्धतीने, फुले नाटय़गृहासाठी अनुक्रमे पाच हजार, १० हजार २०० आणि १७ हजार असे दर राहणार आहेत. सुट्टीच्या दिवशी नाटय़प्रयोगासाठी भोसरी नाटय़गृहात २७०० रुपये दर आहे. तोच दर सांगवीत ४१०० रुपये करण्यात आला आहे. याशिवाय, बालनाटय़, रंगीत तालीम, जादा तासांसाठी विलंब आकार, संगीत नाटके, डोअर कीपर व्यवस्था, जाहिरात बोर्ड व्यवस्था, लाइट व्यवस्था, प्रयोग हस्तांतर शुल्क, निवासी व्यवस्था, स्टेज साहित्य आदींचे दर भोसरीच्या तुलनेत सांगवी नाटय़गृहात जास्त राहणार आहेत. मुळात फुले नाटय़गृहाची आसनक्षमता जेमतेम सातशेच्या आत आहे. नाटय़गृह नवीन आहे. चिंचवड तसेच भोसरीच्या तुलनेत सांगवीत प्रयोगसंख्या कमीच राहील, अशी शक्यता आहे. त्यामुळे सुरुवातीच्या काळात इतर नाटय़गृहांप्रमाणेच दर ठेवावेत व कालांतराने दर वाढवण्यात यावेत, अशी मागणी आहे. मात्र, सुरुवातीच्याच काळात जास्तीचे दर आकारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. स्थायी समितीने हा प्रस्ताव मंजूर केला असला, तरी आगामी पालिका सभेत त्यावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. त्यानंतर, नवे भाडेदर आकारणी सुरू होणार आहे.