गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणारी चारही प्रमुख धरणे काठोकाठ भरली आहेत. धरणांमधील एकूण पाणीसाठा २६.६४ टीएमसी एवढा झाला आहे. पानशेत धरणातून खडकवासला धरणात आणि खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. संततधार पाऊस असाच सुरू राहिल्यास धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुण्यातील धरणांमध्ये चांगला पाणीसाठा झाला आहे. तर, जिल्ह्य़ातील पानशेत, खडकवासला, पवना, नीरा देवघर, चासकमान, कळमोडी, आंद्रा, भामा आसखेड आणि वडिवळे अशी नऊ धरणे शंभर टक्के भरली आहेत. पानशेत धरणातून दिवसभरात तीन हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले. त्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात साडेचार हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. तर, पवना धरणातूनही मुळा नदीमध्ये दिवसभरात पाच हजार ९७० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. गेल्या चोवीस तासांत टेमघर धरण परिसरात ८२ मिलिमीटर, वरसगाव ७०, पानशेत ६८ आणि खडकवासला धरण परिसरात ३० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली.

मावळ तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरलेल्या पवना धरणाचे दरवाजे मंगळवारी एक फुटाने उघडण्यात आले. धरणातून मोठय़ा प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने शिवली गावाला जोडणारा पूल पाण्याखाली गेला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर, लोणावळा शहरातील वळवण धरण भरल्याने त्यामधून खोपोली परिसरात मोठय़ा प्रमाणात पाणी सोडण्यात आले. त्यामुळे पाताळगंगा नदीला पूर आला आहे. पावसाचा जोर आणखी वाढल्यास धरणाचे दोन दरवाजे उघडत वळवण येथून पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती टाटा कंपनीकडून देण्यात आली. लोणावळा नगरपरिषदेने वळवण, लव्हाळवाडी, खत्री फार्म या सखल भागातील नागरिकांना स्थलांतरित करण्यासाठी वळवण व तुंगार्ली शाळेत व्यवस्था करण्यात आली आहे.

प्रमुख धरणांमधील पाणीसाठा 

(टीएमसी) आणि टक्क्य़ांमध्ये

पानशेत                         १०.६५ / १००

पवना                                ८.५१ / १००

कळमोडी                         १.५१ / १००

चासकमान                      ७.५७ / १००

आंद्रा                                 २.९२ / १००

कासारसाई                      ०.५५ / ९७.१४

डिंभे                               १२.३६ / ९८.९९

टेमघर                             १.७१ / ४६.०५

वरसगाव                      १२.३० / ९५.९६

खडकवासला                     १.९७ / १००

भामा आसखेड                   ७.६७ / १००

नीरा देवघर                       ११.७३ / १००

भाटघर                         २२.८८ / ९७.३५

वीर                                 ६.८५ / ७२.७७

उजनी                           ४८.५६ / ९०.६५

 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nine dams in pune district filled hundred percent