तीन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने महापालिकेत कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. अश्विन वसंत पवार असं या सुरक्षा रक्षकाचे नाव असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या प्रकाराचा राष्ट्रीय मजदूर संघाने तीव्र निषेध केला असून त्याविरोधात मंगळवारी महापालिका भवनासमोर आंदोलन करण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अश्विन पवार हे टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालयात नियुक्तीला होते. महापालिका अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे त्यांच्यावर ही वेळ आली आहे. अधिकारी कंत्राटदाराला पाठीशी घालत आहेत, असा आरोप राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी केला.

महापालिकेच्या विविध विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीने सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुरक्षा रक्षक पुरविण्याचे काम क्रिस्टल या संस्थेला देण्यात आले आहे. या संस्थेने पंधराशे कंत्राटी कामगारांची विविध विभागात नियुक्ती केली आहे. महापालिकेचे रुग्णालये, उद्यान, वेगवेगळ्या इमारती, कार्यालये यांच्या सुरक्षेचे काम त्यांना देण्यात आले आहे. मात्र सुरक्षा रक्षकांना कामगार कायद्याअंतर्गत कोणतेही लाभ मिळत नाहीत, अशा तक्रारी सातत्याने करण्यात आल्या आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Not get salary for 3 months security guard attempt to commit suicide pune print news rmm