भरधाव पीएमपी बसने अंध विद्यार्थिनीसह दोघांना धडक दिल्याची घटना कर्वे रस्त्यावरील गरवारे महाविद्यालय परिसरात घडली. अपघातात दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वैभव विष्णू क्षीरसागर (वय २१), मयुरी मुरलीधर गरुड (वय २४, दोघे रा. मुलांचे शासकीय वसतिगृह, मोशी प्राधिकरण, पिंपरी-चिंचवड) अशी गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. या प्रकरणी पीएमपी चालक शिवदास अशोक काळे (वय ३५, रा. विट्ठल रुक्मिणी मंदिराशेजारी, जाधव बिल्डींग, कात्रज गावठाण) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा >>> पुणे : महाविकास आघाडीच्या संयुक्त बैठकीचा मुहूर्त ठरेना
याबाबत स्वामी यल्लप्पा धनगर (वय ५२, रा. वैदुवाडी, सेनापती बापट रस्ता) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वैभव क्षीरसागर, मयुरी गरुड कामानिमित्त पुण्यात आले होते. दोघे जण कर्वे रस्त्यावरून निघाले होते. आबासाहेब गरवारे महाविद्यालय परिसरातून दोघे निघाले होते. त्या वेळी भरधाव पीएमपी बसने त्यांना धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या दोघांना नागरिकांनी तातडीने कर्वे रस्त्यावरील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच डेक्कन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सहायक पोलीस निरीक्षक चोरमले तपास करत आहेत.