पुणे : मेट्रो रेल्वेसाठी स्थलांतरित करण्यात आलेल्या शिवाजीनगर येथील धान्य गोदामाच्या बदल्यात उरुळी देवाची येथील गायरान जमिनीची जागा तब्बल पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर शहर अन्नधान्य वितरण विभागाला प्राप्त झाली आहे. या नव्या जागेत महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (महामेट्रो) लवकरच बांधकाम सुरू केले जाणार आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून धान्य गोदामाच्या जागेचा तिढा अखेर सुटला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महामेट्रोकडून करण्यात येणाऱ्या वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी चिंचवड, तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पुणे मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी – पीएमआरडीए) करण्यात येणारी हिंजवडी ते शिवाजीनगर या तिन्ही मेट्रो मार्गिका शिवाजीनगर येथे एकत्र येणार आहेत. या ठिकाणी बहुउद्देशीय वाहतूक केंद्र (मल्टिमोडल हब) प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी असलेले शहराचे धान्य गोदाम तात्पुरते फुरसुंगी येथे खासगी जागेत स्थलांतरित करण्यात आले आहे.

हेही वाचा – धक्कादायक…येरवडा कारागृहातून कैद्याचे पलायन

धान्य गोदामासाठी कायमस्वरुपी जागा मिळण्यासाठी उरुळी देवाची येथील सुमारे १४ एकर गायरान जागा मंजूर करण्यात आली आहे. त्याचा आराखडा तयार करण्यात आला. सध्या फुरसुंगी येथे खासगी जागेत असलेल्या धान्य गोदामाचे जागेचे भाडे महामेट्रोकडून देण्यात येत आहे. करारानुसार त्याची मुदत तीन वर्षांपर्यंत आहे. या तीन वर्षांत धान्य गोदामासाठी जागा शोधणे, ती मिळवणे ही प्रक्रिया करावी लागणार होती. मात्र, राज्य शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही जागा मिळत नव्हती. अखेर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी मध्यस्थी करत या जागेचा आगाऊ ताबा शहर अन्नधान्य वितरण विभागाला दिला आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख हे वखार महामंडळ आणि महामेट्रो यांच्यासमवेत बैठक घेणार आहेत. त्यानंतर या दोन्ही यंत्रणांकडून धान्य गोदामाचा आराखडा निश्चित करण्यात येईल, असे शहर अन्नधान्य वितरण अधिकारी दादासाहेब गिते यांनी सांगितले.

हेही वाचा – पुण्यातील आमली पदार्थ तस्कर प्रकरणाची पायामुळे परदेशातील बड्या तस्करांपर्यंत, गोपनीय अहवालातील धक्कादायक माहिती

शिवाजीनगर येथील धान्य गोदामाच्या जागेत सुमारे २४ हजार चौरस फुटांचे बांधकाम होते. तेवढे बांधकाम उरुळी देवाची येथील जागेत ‘महामेट्रो’ करून देणार आहे. विभागीय आयुक्त राव यांच्या मध्यस्थीने जागेचा आगाऊ ताबा मिळाला आहे. या जागेचा सातबारा अन्नधान्य वितरण विभागाच्या नावे करण्यात आला आहे. महामेट्रोकडून लवकरच बांधकाम करण्यात येईल. त्यामध्ये अभिलेख कक्ष, हडपसर परिमंडळ कार्यालय, कार्यालयीन कक्ष, १८०० टनांची पाच-सहा गोदामे तयार करण्यात येणार आहेत. – दादासाहेब गिते, शहर अन्नधान्य वितरण अधिकारी

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Possession of site after five years for grain warehouse construction soon from mahametro pune print news psg 17 ssb