पुणे : रास्ता पेठेत पादचारी नागरिकाकडील मोबाईल संच हिसकावून पसार झालेल्या चोरट्याला गुन्हे शाखेने पकडले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या प्रकरणी प्रतीक शेंडगे (रा. बी. टी. कवडे रस्ता) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत लक्ष्मीकांत मुसळे (वय ५२, रा. रास्ता पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. मुसळे दररोज सकाळी फिरायला जातात. रास्ता पेठेतील पॅावर हाऊस चौकातून ते सकाळी जात होते. त्या वेळी दुचाकीस्वार चोरटा शेंडगे आणि त्याच्याबरोबर असलेल्या साथीदाराने मुसळे यांच्या हातातील मोबाईल संच हिसकावून नेला होता.

पसार झालेल्या चोरट्याचा माग काढण्यात येत होता. पॅावर हाऊस चौक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतले होते. शेंडगे आणि साथीदाराने मोबाईल संच हिसकावून नेल्याची माहिती तपासात मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने बी. टी. कवडे रस्ता परिसरातून शेंडगेला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दुचाकी जप्त करण्यात आली. सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भोसले, उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनील कुलकर्णी, अजय जाधव, निलेश साबळे, शुभम देसाई, अजय थोरात आदींनी ही कारवाई केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune police arrest cell phone thief pune print news zws