पुणे : प्रवासी महिलेचा विनयभंग करुन पसार झालेल्या रिक्षाचालकाला हडपसर पोलिसांनी अटक केली. शिवशंकर वैजनाथ परळीकर (वय २१, रा. श्रमिक वसाहत, कर्वेनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तक्रारदार महिला २४ जानेवारी रोजी हडपसर गाडीतळ परिसरातून रिक्षाने मांजरीकडे निघाली होती. सिरम कंपनीजवळ असलेल्या रस्त्यावर रिक्षाचालक परळीकरने रिक्षा थांबविली आणि महिलेशी अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. महिलेने आरडाओरडा केल्यानंतर तो पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी तपास सुरू केला. हडपसर गाडीतळ ते मांजरी भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण पोलिसांनी तपासले. चित्रीकरणावरुन पसार झालेला रिक्षाचालक परळीकर याचा माग काढून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर पोलीस ठाण्योच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, गुन्हे शाखेचे निरीक्षक नीलेश जगदाळे, अमर काळंगे, सहायक निरीक्षक अर्जुन कुदळे, संदीप राठोड, समीर पांडुळे, अभिजित राऊत यांनी ही कामगिरी केली.

रिक्षा थांब्यावर दहशत माजविणारा गजाआड

हडपसर गाडीतळ भागातील रिक्षा थांब्यावर दहशत माजवून रिक्षाचालकांकडे दरमहा दोन हजार रुपये हप्त्याची मागणी करणाऱ्या सराइताला पोलिसांनी अटक केली. बाळू भीमराव डोके (वय ४८, रा. वेताळबाबा वसाहत, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका रिक्षाचालकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. डोके याची पार्श्वभूमी गुन्हेगारी आहे. त्याला शहरातून तडीपार करण्यात आले होते. तडीपारीचा कालावधी पूर्ण केल्यानंतर तो पुन्हा शहरात आला. त्याने गाडीतळ परिसरातील रिक्षा थांब्यावर दहशत माजविली. या भागात व्यवसाय करायचा असेल, तर दरमहा दोन हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, अशी धमकी दिली. तक्रारदार रिक्षाचालकाची काच फोडून कोयता उगारुन दहशत माजविली. पसार झालेल्या डोकेला पोलिसांनी पकडून अटक केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune rickshaw driver arrested for molesting woman passenger pune print news rbk 25 ssb