‘‘विज्ञान-तंत्रज्ञानावर आपण उत्तम खर्च करतो, परंतु विज्ञानातील संशोधनाचा अर्थव्यवस्थेला होणारा उपयोग तोकडा आहे. दैनंदिन गरजा पूर्ण करू शकेल व बाजारपेठेतील उत्पादनात रुपांतरित होऊ शकेल अशा नावीन्यपूर्ण संशोधनाची मानसिकता रुजवणे गरजेचे आहे,’’ असे मत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय विद्या भवनच्या मुक्तांगण विज्ञानशोधिका केंद्रातर्फे उभारल्या जाणाऱ्या ‘इनोव्हेशन हब’ प्रकल्पाचे रविवारी काकोडकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. आर. दुभाषी, ‘इस्रो’चे माजी संचालक डॉ. प्रमोद काळे, ज्येष्ठ उद्योजक अरुण फिरोदिया, विज्ञानशोधिका केंद्राचे मानद संचालक अनंत भिडे, उपसंचालिका नेहा निरगुडकर, भारती बक्षी या वेळी उपस्थित होते. कोलकात्याच्या ‘नॅशनल सेंटर फॉर सायन्स’ संग्रहालयाची या ‘हब’साठी मान्यता मिळाली असून त्याच्या उभारणीचा निम्मा खर्च विज्ञानशोधिका केंद्र व निम्मा खर्च सरकार करणार आहे.

काकोडकर म्हणाले, ‘‘विज्ञानासाठी विज्ञान संशोधन (सायन्स फॉर द सेक ऑफ सायन्स) हे महत्त्वाचे आहे, परंतु संशोधनाचा अधिक क्षमतेने अर्थव्यवस्थेसाठी कसा उपयोग करून घेता येईल याचा विचार करायला हवा.

आपल्याकडे मोठय़ा विज्ञान संस्था आहेत. विद्यार्थ्यांना कधीतरीच त्या ठिकाणी भेट देण्याची संधी मिळते आणि त्याचे अप्रूपही वाटते, परंतु त्यांच्यासाठी विज्ञान-तंत्रज्ञानाची क्रीडांगणे ठरतील अशी केंद्रे सुरू होणे गरजेचे आहे. असे झाल्यास हळूहळू मानसिकतेत बदल होऊ शकेल. शिक्षणासारख्या सरकारी यंत्रणांवर सकारात्मक पद्धतीने प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करणेही आवश्यक आहे.’’

‘आपण संशोधन करून विकसित केलेले उत्पादन बाजारापर्यंत पोहोचेल का, याविषयी विज्ञान प्रयोगशाळांकडून विशेष दक्षता घेतली जात नाही. समाजातील अगदी शेवटच्या व्यक्तीसाठी नावीन्यपूर्ण संशोधन करता येईल का, हे खरे आव्हान आहे,’ असे मत फिरोदिया यांनी व्यक्त केले.

‘प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांचे अनुदान थांबवले जाते’ – डॉ. माधव गाडगीळ

‘‘पर्यावरणाबद्दलची आजची धोरणे पाहता प्रामाणिकपणे काम करणाऱ्या संस्थांची अनुदाने थांबवली जातात. परंतु ‘नागरिकांचे विज्ञान’ (सिटिझन सायन्स) या संकल्पनेच्या माध्यमातून आपण बरेच काही करू शकतो. पर्यावरणाच्या वास्तवाचे चित्रण नागरिकच निर्माण करू शकतात व देशभर अगदी शालेय मुलांपासून ही चळवळ उभी करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. केरळमध्ये दगडखाणींविषयीची उत्तम माहिती स्थानिकांनी तंत्रज्ञानाच्या वापराने तयार केली आहे,’’ असे ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी सांगितले.

‘इनोव्हेशन हब’च्या उद्घाटनप्रसंगी गाडगीळ यांच्यासह राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्राचे संचालक डॉ. शेखर मांडे, ‘आयसर’मधील शास्त्रज्ञ डॉ. सतीश ओगले व ‘केपीआयटी कमिन्स’चे अध्यक्ष रवी पंडित यांच्याशी डॉ. उदय निरगुडकर यांनी संवाद साधला. ‘इंडिया २०२२ च्या ध्येयपूर्तीसाठी विज्ञान-तंत्रज्ञानाचे योगदान’ असा या परिसंवादाचा विषय होता.  या वेळी बोलताना नॉर्वे देशाने संयमाने केलेले तेल उत्पादन आणि याच्या अगदी उलट असलेली अमेरिकेची धोरणे यांचे उदाहरण देऊन गाडगीळ म्हणाले, ‘‘आपण ‘पहिल्या जगातील देश’ (फस्र्ट् वर्ल्ड कंट्री) होण्याचा विचार करत असू तर आपण अमेरिकेसारखा नव्हे तर नॉर्वेसारखा देश होण्याचा विचार करत असू, अशी आशा आहे.’’

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Science research to be useful for the economy says dr anil kakodkar