सिद्धू मुसेवाला खून प्रकरणातील संशयित  संतोष जाधवसह साथीदारांना न्यायालयीन कोठडी

पोलीस कोठडीचे हक्क अबाधित ठेवून न्यायालयाने चौघा आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

jail
प्रतिनिधिक छायाचित्र

पुणे : पंजाबी गायक, काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित तसेच आंबेगाव तालुक्यातील ओंकार बाणखेले खून प्रकरणातील मुख्य आरोपी संतोष जाधव याला विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश सोमवारी दिले. आरोपी संतोष सुनील जाधव (वय २८, रा. मंचर) याच्यासह साथीदार सिद्धेश कांबळे उर्फ सौरभ महाकाळ (वय १९, रा. नारायणगाव), नवनाथ सुरेश सूर्यवंशी (वय २८, रा. गुजरात), तेजस कैलास शिंदे (वय २२, रा. नारायणगाव) यांच्या पोलीस कोठडीचे हक्क अबाधित ठेवून न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. पूर्ववैमनस्यातून गेल्या एक वर्षी आंबेगाव तालुक्यातील एकलहरे गावात ओंकार बाणखेले याचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. बाणखेले खून प्रकरणात मुख्य आरोपी संतोष जाधव याच्यासह चौदा आरोपींच्या विरोधात पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली होती. जाधव, महाकाळ, सूर्यवंशी, शिंदे यांच्या पोलीस कोठडीची मुदत सोमवारी संपली. त्यानंतर चौघांना न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपी साक्षीदारावर दबाव आणण्याची शक्यता आहे. बाणखेले खून प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांकडे तपास करून पुरावे गोळा करायचे आहेत तसेच आरोपीं विरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल करायचे आहे, असे विशेष सरकारी वकील ॲड. विजय फरगडे यांनी न्यायालयात युक्तीवादात सांगितले. त्यानंतर पोलीस कोठडीचे हक्क अबाधित ठेवून न्यायालयाने चौघा आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sidhu moosewala murder case suspect santosh jadhav sent in judicial custody zws

Next Story
एकाच दिवशी २५० शाळांमध्ये वृक्षारोपण ; शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे धडे आवश्यक – आयुक्त
फोटो गॅलरी